मुंबई, ठाणे, कोकण व मराठवाड्यात पावसाची शक्यता, पुढील ५ दिवस महत्त्वाचे
मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठवाड्यात पुढील ५ दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून
मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठवाड्यात पुढील ५ दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून. मराठवाड्यात पावसाची हजेरी शेतकऱ्यांसाठी दिलासा.
सायली मेमाणे
पुणे ७ ऑगस्ट २०२५ : महाराष्ट्रात पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठवाडा या भागांमध्ये पुढील पाच दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत गुरुवारी पहाटेपासून वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, दादर, हिंदमाता या भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत मुंबई आणि ठाण्यात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. कोकणातील काही भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती, त्यामुळे तेथील शेती पाण्याअभावी अडचणीत आली होती. मात्र, आता मराठवाड्यालाही दिलासा देणारा अंदाज जाहीर झाला आहे. मेघगर्जनेसह पावसामुळे कोरड्या जमिनींना पुन्हा जिवनदान मिळण्याची शक्यता आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात देखील ३ ते ४ तासांत अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी पडतील, असेही सांगण्यात आले आहे. बुधवारी देखील विदर्भ, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अनुभव आला.
दरम्यान, उत्तर भारतात देखील हवामानाची तीव्रता वाढली आहे. उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्यानंतर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पूल आणि घरांचे नुकसान झाले असून महाराष्ट्रातील सुमारे ५० पर्यटक या भागात अडकले आहेत. हवामान विभागाने उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून त्यानंतर परिस्थितीत थोडी सुधारणा होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांनी या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घ्यावी आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे. शेतकरी बांधवांनी पेरणी आणि पिकांच्या नियोजनासाठी पावसाच्या या सुस्पष्ट अंदाजाचा लाभ घ्यावा.