मुंबईत ‘सिंदूर’ पूलचे उद्घाटन; कर्नाकच्या काळ्या इतिहासावर मोदींचा ‘सिंदूर’, वाहतूक कोंडीला दिलासा

0
सिंदूर पूल उद्घाटन: इतिहास बदलणारा पूल मुंबईकरांच्या सेवेत

सिंदूर पूल उद्घाटन: इतिहास बदलणारा पूल मुंबईकरांच्या सेवेत

मुंबईच्या मशीद बंदर परिसरात ‘सिंदूर’ पूलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. कर्नाक पूलचं नाव बदलून सिंदूर करण्यात आलं, आता पूर्व-पश्चिम वाहतूक कोंडी होणार सुकर.

सायली मेमाणे

पुणे १० जुलै २०२५ : मुंबई – मुंबईच्या मशीद बंदर परिसरातील ऐतिहासिक ‘कर्नाक पूल’ आता ‘सिंदूर पूल’ या नावाने ओळखला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले असून, दुपारी ३ वाजल्यापासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुलाचे नामकरण ‘कर्नाक’ वरून ‘सिंदूर’ करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. मोदींनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ब्रिटिश अत्याचारांचे प्रतीक असलेल्या सार्वजनिक नावांचे रूपांतर करण्याची भूमिका मांडली होती.

‘कर्नाक’ नावाचा पूल ब्रिटिश गव्हर्नर कर्नाकच्या नावे होता. तो भारतीयांवर अन्याय करणारा अधिकारी होता आणि त्याच्या नावाशी संबंधित असलेल्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी या पूलाचे नामकरण ‘सिंदूर’ असे करण्यात आले. ‘सिंदूर’ हे नाव ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेच्या स्मृतीनिमित्त ठेवण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करून त्यांना नष्ट केले होते. ही लष्करी कामगिरी प्रेरणादायी ठरली असून त्याच्याच गौरवासाठी हा पूल ‘सिंदूर’ म्हणून ओळखला जाईल.

या पूलाची एकूण लांबी 342 मीटर असून त्यातील 70 मीटरचा भाग रेल्वेच्या हद्दीत येतो. मुंबई महापालिकेने दाटीवाटीच्या भागात अत्यंत कमी वेळात उत्तम दर्जाचे काम पूर्ण केल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेच्या टीमचे कौतुक केले. मुंबईतील दक्षिण भागातील वाहतुकीसाठी सिंदूर पूल अत्यंत उपयुक्त ठरणार असून, तो पी. डी’ मेलो मार्गाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली रोडशी जोडतो. पुलाच्या पुनर्बांधणीमुळे गेल्या दहा वर्षांपासून अडथळ्यांमुळे खोळंबलेली पूर्व-पश्चिम वाहतूक आता सुरळीत होणार आहे.

सिंदूर पुलामुळे पी डी’ मेलो मार्ग, वालचंद हिराचंद मार्ग आणि शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूंवर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. शिवाय युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली रोड, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग आणि काझी सय्यद मार्गावरील वाहतुकीला सुलभता मिळेल. या नव्या पुलामुळे केवळ वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही, तर ब्रिटिश कालखंडातील अन्यायकारी इतिहासाच्या खुणा पुसण्याची एक ऐतिहासिक संधीही मिळणार आहे. ‘सिंदूर’ या नावाने पूल उद्घाटन करून केंद्र व राज्य सरकारने देशभक्ती आणि आत्मगौरव यांचे प्रतीक उभारले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed