मोखाडा खोडाळा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा – पारंपरिक नृत्य, रॅली आणि सांस्कृतिक जल्लोष
मोखाडा खोडाळा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा – पारंपरिक नृत्य, रॅली आणि सांस्कृतिक जल्लोष
मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे जागतिक आदिवासी दिन शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत पारंपरिक नृत्य, भव्य रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑगस्ट २०२५ : मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन पारंपरिक जल्लोषात आणि सांस्कृतिक अभिमानाने साजरा करण्यात आला. सकाळपासूनच बाजारपेठेतून शेकडो आदिवासी बांधवांनी पारंपरिक पेहरावात भव्य रॅली काढली. डीजे, संबळ, तुतारी आणि तारपा वाद्यांच्या तालावर महिला-पुरुषांनी नृत्य करत वातावरण उत्साहाने भारावून टाकले. “जय आदिवासी, जय जोहार”च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात वीर आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात विक्रमगड आमदार हरिश्चंद्र भोये, माजी आमदार सुनील भुसारा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. रॅलीनंतर ग्रामपंचायत सभागृहात आदर्श व्यक्ती सन्मान सोहळा पार पडला, ज्यामध्ये समाजकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी भाषणातून क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करून दिले आणि आदिवासी समाजाने आपली सांस्कृतिक परंपरा जपत शिक्षण व प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्याचे आवाहन केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी समन्वय समिती आणि स्थानिक ग्रामपंचायत यांनी केले होते. महिला, युवक-युवती आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होत, एकजुटीचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा हा उत्सव सर्वांच्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेला.