राज ठाकरे vs निशिकांत दुबे वाद: मराठी विरुद्ध हिंदी पुन्हा पेटले, मनसे-ठाकरे गट आक्रमक
राज ठाकरे vs निशिकांत दुबे वाद: मराठी विरुद्ध हिंदी पुन्हा पेटले, मनसे-ठाकरे गट आक्रमक
निशिकांत दुबे यांच्या मराठी विरोधी विधानामुळे मुंबईत ‘हिंदी विरुद्ध मराठी’ वाद उफाळला आहे. मनसे व ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर; बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी तीव्र.
सायली मेमाणे
पुणे ४ ऑगस्ट २०२५ : राज ठाकरे आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘मराठी विरुद्ध हिंदी’चा मुद्दा पेटला आहे. दुबे यांनी दिलेल्या मुलाखतीत, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाचे राजकारण पूर्णपणे संपेल, असा दावा करत मराठी जनतेच्या भावना दुखावल्या. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की मुंबईच्या विकासात उत्तर भारतीय समाजाचे मोठे योगदान असून केवळ मराठी माणूसच या शहराचा मालक असल्याचा दावा चुकीचा आहे. मुंबईच्या मतदारसंघात केवळ ३० टक्के लोक मराठी बोलतात, ३० टक्के हिंदी भाषिक असून उर्वरित गुजराती, राजस्थानी आणि भोजपुरी भाषिक आहेत, हे सांगत त्यांनी ठाकरे बंधूंच्या भाषिक राजकारणाला आव्हान दिलं आहे.
या वक्तव्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाने जोरदार प्रतिक्रिया दिली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी निशिकांत दुबे यांना थेट इशारा दिला की, ते महाराष्ट्रात कधी येतात याची आम्ही वाट पाहतोय आणि त्यांचं स्वागत आमच्या पद्धतीने करू. त्यांनी असा आरोपही केला की, दुबे यांच्यामागे वेगळा ‘बोलवणारा धनी’ आहे जो या प्रकारचा वाद पेटवत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही परखड शब्दांत निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर देत म्हटलं की, दुबे यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. पण दुबे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात बोलत असताना राज्यातील सरकार शांत आहे, हे आश्चर्यकारक आहे. राऊतांनी हेही लक्षात आणून दिलं की, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 106 मराठी वीरांनी बलिदान दिलं, ज्यात दुबे यांचा सहभाग नव्हता.
दुबे यांनी मुंबईतील हिंदी भाषिक समाजाचे योगदान अधोरेखित करत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर थेट प्रहार केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील भाषिक समतेचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला आहे. मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) हे नेहमीच मराठी हिताच्या मुद्द्यावर प्रखर भूमिका घेत आले आहेत आणि दुबे यांच्या विधानाने या पक्षांना नव्याने आक्रमक होण्यास प्रवृत्त केलं आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादामुळे वातावरण तापले आहे. दुबे यांनी व्यक्त केलेली भाषिक आकडेवारी आणि ठाकरे बंधूंवरील आरोप, तसेच मनसे-ठाकरे गटाकडून मिळालेलं प्रत्युत्तर, हे सर्वच मुंबईतील राजकारणात आगामी संघर्षाची नांदी मानले जात आहे.
या वादाचा पुढील परिणाम काय होईल आणि यामुळे मराठी विरुद्ध हिंदी हा वाद किती उग्र होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र, मराठी अस्मिता आणि मुंबईच्या स्वाभिमानावर झालेला हा हल्ला राजकीय पक्षांना शांत बसू देणार नाही, हे निश्चित.