स्वारगेट बसस्थानकाकडे शासनाचे दुर्लक्ष; प्रवासी आणि स्थानिक त्रस्त
स्वारगेट बसस्थानकाकडे शासनाचे दुर्लक्ष; प्रवासी आणि स्थानिक त्रस्तस्वारगेट बसस्थानकाकडे शासनाचे दुर्लक्ष; प्रवासी आणि स्थानिक त्रस्त
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात पाणीगळती, खड्डे, सुरक्षा अभाव आणि चोरट्यांचा वावर; प्रवाशांनी आधुनिक बसस्थानकाची मागणी केली.
सायली मेमाणे
पुणे १४ ऑगस्ट २०२५ : पुणे – महाराष्ट्रातील पश्चिम भागाच्या दळणवळणासाठी महत्त्वाचे मानले जाणारे स्वारगेट बसस्थानक गेल्या सात दशकांपासून प्रवाशांची वाहतूक सुलभ करत आहे. दररोज सुमारे १,३०० बस येथेून सुटतात आणि १,५०० बस बाहेरून येथे येतात. परिणामी, ५०,००० ते ६०,००० प्रवासी दररोज येथे प्रवास करतात. मात्र, या महत्त्वाच्या बसस्थानकाची आजही दयनीय अवस्था असून, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
पावसाळ्यात उघड होणाऱ्या समस्या
पावसाळ्यात स्वारगेट बसस्थानकाची अवस्था अधिकच बिकट होते. इमारतींमध्ये पाणीगळती, छताचा गिलावा निघून लोखंडी सळ्या उघड होणे, जागोजागी खड्डे आणि साचलेले पाणी ही येथे रोजची दृश्ये झाली आहेत. प्रवाशांसाठी असलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील निकृष्ट आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, स्वारगेट बसस्थानकाचे आधुनिकीकरण अत्यावश्यक असल्याचे प्रवासी सांगतात.
तीन मंत्री असूनही विकास नाही
पुणे शहरात एक केंद्रीय राज्यमंत्री, एक राज्य कॅबिनेट मंत्री आणि खुद स्वारगेटचे आमदार व राज्यमंत्री माधुरी मिसाळ असतानाही, या बसस्थानकाच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. बारामती आणि कराडप्रमाणे आधुनिक, सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.
वाद आणि गुन्हेगारी प्रवृत्ती
गेल्या काही वर्षांत स्वारगेट बसस्थानक वारंवार वादविवादात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतरही प्रशासनाने ठोस पावले उचललेली नाहीत. परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि व्यसनाधीन लोकांचा वावर असल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.
सुरक्षा व्यवस्था आणि चोरट्यांचा वावर
अत्याचाराच्या घटनेनंतर २४ तास सुरक्षा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परिवहन महामंडळ आणि पुणे पोलिसांनी ऑडिट व बैठका घेऊन नियोजन केले. तरीही, चोरट्यांचा वावर थांबलेला नाही. अलीकडेच सलग तिसऱ्यांदा प्रवाशांकडील सामान चोरीला गेल्याची घटना घडली. रविवारी घडलेल्या प्रकरणात रितेश गजानन बकरे (वय २०) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
प्रवाशांचा संताप आणि मागणी
प्रवाशांचा संताप उफाळून आला असून, स्वारगेट बसस्थानकाच्या नव्या उभारणीसाठी आणि सर्वांगीण आधुनिकीकरणासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे. पायाभूत सुविधा सुधारून, सुरक्षा व्यवस्था मजबूत करून आणि स्वच्छतेसाठी कठोर पावले उचलल्यासच या बसस्थानकाची प्रतिमा बदलू शकते, असे स्थानिकांचे मत आहे.