एक रुपयाचाही भाडेवाढ न करता लोकल एसी करणार; मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
एक रुपयाचाही भाडेवाढ न करता लोकल एसी करणार; मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी IIMUN Youth Connect कार्यक्रमात लोकल ट्रेन पूर्णपणे एसी करण्याची घोषणा केली. दरवाजे बंद होणारे, मेट्रोसारखे कोच आणि तरीही सेकंड क्लासमध्ये भाडेवाढ होणार नाही.
सायली मेमाणे
पुणे २४ नोव्हेंबर २०२५ : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकल ट्रेन सेवेत मोठा बदल करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या IIMUN Youth Connect या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी उपनगरीय लोकल ट्रेन सेवा पूर्णपणे बदलण्याची भविष्यातील योजना स्पष्ट केली. “एक रुपयाचीही भाडेवाढ न करता लोकल ट्रेन एसी करण्याचा निर्णय घेतला जात आहे,” असे त्यांनी सांगितल्याने मुंबईकरांमध्ये उत्सुकता आणि समाधान दोन्ही निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, “लोकल ट्रेन ही मुंबईची जीवन वाहिनी आहे. दररोज अंदाजे 90 लाख नागरिक लोकलने प्रवास करतात. मेट्रो सेवा सुधारली आहे, सुविधा वाढल्या आहेत; पण आजही लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणे अनेकांसाठी अत्यंत कष्टदायक ठरते. गर्दी, लटकून प्रवास करावा लागणारी अवस्था आणि उकाड्यामुळे प्रवास त्रासदायक बनतो. त्यामुळे आम्ही लोकल ट्रेनचे सर्व कोच मेट्रोप्रमाणे एसी करण्याचा निर्णय घेतला आहे.”
या घोषणेतील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे भाडेवाढ होणार नाही हे स्पष्टपणे सांगितले जाणे. फडणवीस यांनी म्हटले, “इतकी सुंदर, आधुनिक आणि आरामदायी सेवा देत असताना सेकंड क्लासचे भाडे मात्र वाढवले जाणार नाही. मुंबईकरांचा आर्थिक बोजा वाढवण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही.” यामुळे उपनगरीय प्रवाशांचा दिलासा वाढला असून बदललेल्या सेवेसाठी लागणारा निधी केंद्र आणि राज्य सरकार मिळून उभारतील अशी माहिती पुढे आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मते, लोकल कोचेसमध्ये एसी सुविधा जोडण्याबरोबरच दरवाजेही पूर्णपणे स्वयंचलित आणि बंद होणारे असतील. यामुळे लोकलच्या दरवाज्यावर लटकून प्रवास करण्याची प्रथा कमी होईल आणि अपघातांची संख्या घटेल. मुंबईमध्ये लोकलच्या दरवाज्यावरून पडून होणारे अपघात दरवर्षी मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे दरवाजे बंद असलेले कोच हे प्रवासी सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून बघितले जात आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पांनी मोठी प्रगती केली आहे. मेट्रोसारखी सुविधा लोकल ट्रेनमध्येही आणल्यास शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एसी लोकल्स सध्या आहेत, परंतु त्यांचे भाडे जास्त असल्याने सर्वसामान्य प्रवासी त्यांचा वापर करत नाहीत. आता सेकंड क्लासच्या भाड्यात वाढ न करता सर्वच लोकल्स एसी करण्याचा प्रस्ताव आल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी मुंबईतील भविष्यातील वाहतूक विकास आराखड्यावरही प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, मेट्रो मार्ग, कोस्टल रोड, जलवाहतूक आणि लोकल सुधारणा या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था देशातील सर्वात प्रगत शहरांपैकी एक बनेल. लोकल ट्रेन अपग्रेडेशन हा या संपूर्ण योजनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
या घोषणेने मुंबईतील उपनगरीय प्रवाशांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे. गर्दीतून, उकाड्याने आणि जीवावर उदार होऊन प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी हा निर्णय एक मोठा सकारात्मक टप्पा ठरू शकतो. पुढील काही महिन्यांत या प्रकल्पाची अंमलबजावणी कशी होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information