एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले; 404 कोटींच्या प्रतिपूर्तीची प्रतीक्षा, सरकारची घोषणा हवेत विरली

0
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला; सरकारकडून 404 कोटींच्या प्रतिपूर्तीची प्रतीक्षा, जूनमधील घोषणा हवेत विरली

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला; सरकारकडून 404 कोटींच्या प्रतिपूर्तीची प्रतीक्षा, जूनमधील घोषणा हवेत विरली

महाराष्ट्र एसटी महामंडळाचे 83 हजार कर्मचारी अद्याप वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारकडून 404 कोटींच्या प्रतिपूर्ती रकमेचा विलंब आणि जूनमधील घोषणा हवेत विरल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

सायली मेमाणे

पुणे ८ जुलै २०२५ : मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (ST) तब्बल 83 हजार कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा एकदा वेळेवर झालेले नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून सात तारखेला वेतन मिळण्याची परंपरा खंडित झाली असून, जुलै महिन्यातही कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. कारण, सरकारकडून एसटी महामंडळाला विविध सवलतीपोटी दिली जाणारी 404 कोटी रुपयांची प्रतिपूर्ती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे.

यापूर्वी 3 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कामगार संघटनांच्या बैठकीत पुढील महिन्यांपासून वेतन रखडणार नाही आणि महागाई भत्ता 47 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ती घोषणा प्रत्यक्षात उतरलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी अधिक वाढली आहे.

दरम्यान, उशिरा वेतन मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना घरकर्ज, वैयक्तिक कर्जाच्या हप्त्यांवर व्याज आकारले जात आहे. वेळेवर विमा प्रीमियम भरले न गेल्यास विमा कंपन्यांकडून विचारणा होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागत आहे.

एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, “महामंडळाने अर्थ विभागाकडे सवलतीपोटी थकलेल्या 921 कोटी रुपयांची मागणी केली आहे, त्यातच जून महिन्याच्या 404 कोटींचा समावेश आहे. सरकारकडून निधी मिळाला, तरी किमान दोन दिवसांची प्रक्रिया लागते. त्यामुळे वेतन आणखी लांबणीवर जाऊ शकतो.”

महत्वाचे म्हणजे, दरमहा सरकारकडून निधी मिळवून वेतनाची प्रक्रिया राबवावी लागते. मात्र, मागणीप्रमाणे निधी वेळेवर उपलब्ध होत नाही. यामुळे वेळोवेळी कर्मचारी हक्काच्या पगारासाठी सरकारच्या दारात रांग लावतात. काही महिन्यांपूर्वी सरकारने पगार वेळेवर दिला जाईल अशी मोठी घोषणा केली होती, परंतु ती हवेत विरल्याचे चित्र दिसत आहे.

एसटी बँकेकडूनही एसटी महामंडळाला 40 कोटी रुपयांची रक्कम परत करावी लागल्याने, निधी व्यवस्थापन आणखी अडचणीत आले आहे. या सर्व घडामोडींमुळे सध्या एसटी कर्मचारी मानसिक तणावात असून, वेतन वेळेवर मिळावे हीच त्यांची प्रमुख मागणी आहे.

राज्यात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही सरकारकडून वेतनाच्या बाबतीत वेळेवर निर्णय घेतला जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात रोष वाढताना दिसतो आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी विविध कामगार संघटनांनी केली आहे.

सरकारकडून निधी मिळाल्यानंतरही महिन्याच्या सुरुवातीला वेतन दिले जाईल याची शाश्वती दिली जात नाही, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनासाठीचे हे हवालदिलपण थांबेल असे वाटत नाही.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed