कर्जतमध्ये अडीच वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या; गुप्त माहितीवर पोलिसांनी 5 दिवसांनी मृतदेह बाहेर काढला
कर्जतमध्ये अडीच वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या; गुप्त माहितीवर पोलिसांनी 5 दिवसांनी मृतदेह बाहेर काढला
कर्जतमधील कुरकुलवाडीत अडीच वर्षांच्या चिमुरड्याची शेजारी महिलेने गळा आवळून हत्या केली. 5 दिवसांनंतर गुप्त माहितीवर पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले आणि भयंकर सत्य उघड झाले.
सायली मेमाणे
१६ नोव्हेंबर २०२५ : कर्जत तालुक्यातील कुरकुलवाडी भागातून अडीच वर्षांच्या चिमुरड्याच्या निर्घृण हत्येचा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला या चिमुरड्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले होते. कुटुंबीयांनीही डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर चिमुकल्याचे अंत्यसंस्कार उरकले. मात्र एका नागरिकाने दिलेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी मृतदेह पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदन केले. त्यात मुलाची हत्या गळा आवळून करण्यात आल्याचे स्पष्ट होताच या प्रकाराने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत चिमुरड्याचे नाव जयदीप गणेश वाघ असून तो फक्त अडीच वर्षांचा होता. त्याचे आई-वडील गणेश आणि पुष्पा वाघ हे दोघे ९ नोव्हेंबर रोजी रोजंदारीसाठी बाहेर गेले होते. दोन्ही मुले घरासमोर खेळत असताना शेजारी राहणारी जयवंता गुरुनाथ मुकणे ही महिला त्या ठिकाणी आली. तिने अचानक जयदीपला उचलून घराच्या मागील बाजूस नेले आणि संतापाच्या भरात किंवा सूडाच्या भावनेतून त्याचा गळा आवळून हत्या केली. या घटनेनंतर जयवंता हिने चिमुकला अचानक बेशुद्ध झाल्याचे नाटक केले आणि नैसर्गिक मृत्यू झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मुलगा मृत झाल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी यात कोणताही संशय न बाळगता चिमुरड्याचे अंतिम संस्कार केले. परंतु या घटनेनंतर काही दिवसांनी एका नागरिकाने पोलिसांना माहिती दिली की मुलाचा मृत्यू संशयास्पद आहे आणि त्यात शेजाऱ्यांचा सहभाग असू शकतो. ही माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी तातडीने पावले उचलत चिमुकल्याचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. पोस्टमार्टम अहवालात मुलाची हत्या गळा आवळूनच झाल्याचे निष्पन्न झाले.
या धक्कादायक खुलास्यानंतर पोलिसांनी जयवंता मुकणे हिला ताब्यात घेतले आणि चौकशीदरम्यान तिने स्वतः गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत तिने सांगितले की शेजारील मुले तिच्या मुलांना मारतात म्हणून संतापाच्या भरात तिने चिमुरड्याची हत्या केली. अधिक भयानक बाब म्हणजे घटनेच्या एक दिवस आधी जयवंताने जयदीपच्या ४ वर्षांच्या बहिणीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला. दुसऱ्याच दिवशी तिने खेळताना निरागस चिमुरड्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्याची हत्या केली.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरली असून पीडित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांमध्ये भीती व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरांवरून होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. घटनाक्रमामुळे पुन्हा एकदा बालसुरक्षेचा मुद्दा आणि शेजारील वैमनस्यामुळे उद्भवणाऱ्या धोकादायक परिस्थितींची जाणीव समाजाला झाली आहे. विनाकारण राग, सूड आणि मानसिक अस्थिरतेमुळे निरागस जीवावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी जागरूकता व दक्षता अत्यंत आवश्यक असल्याचे समाजमन पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे.