कल्याणमध्ये किडनी ट्रान्सप्लांटच्या आमिषाने ३२ लाखांची फसवणूक विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा

कल्याणमध्ये किडनी ट्रान्सप्लांटच्या आमिषाने ३२ लाखांची फसवणूक विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा
कल्याण पूर्व चिंचपाडा येथे किडनी ट्रान्सप्लांटसाठी डोनर मिळवून देण्याच्या बहाण्याने ३२ लाख रुपये उकळल्याचा आरोप. समर्थ रुग्णालयाशी संबंधित व्यक्तींवर विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल.
पुणे ०६ मे २०२६ : कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरात किडनी आजाराने ग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या पत्नीची तब्बल ३२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये किडनी ट्रान्सप्लांटसाठी मोठी प्रतीक्षा यादी असल्याचे सर्वश्रुत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत डोनर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत खासगी रुग्णालयाशी संबंधित काही व्यक्तींनी लाखो रुपये उकळल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
तक्रारदार दीपाली चव्हाण या छाया अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीला तातडीने किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता होती. या दरम्यान चिंचपाडा परिसरातील समर्थ रुग्णालय मधील काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी डॉक्टर गौरव नायर यांच्याशी भेट घडवून आणत, किडनी ट्रान्सप्लांटसाठी डोनर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. शस्त्रक्रिया लवकरात लवकर करून देऊ, असा विश्वास देत रुग्णाकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने सुमारे ३२ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
मात्र, प्रत्यक्षात ना डोनर उपलब्ध करून देण्यात आला, ना किडनी ट्रान्सप्लांटची प्रक्रिया पार पडली. पैसे परत मागितल्यावर टाळाटाळ केली गेली, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दीपाली चव्हाण यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर गौरव नायर यांच्यासह मौसमी विसवास, जयदेव विसवास, अभिषेक मन्ना, सुमनता पांडे, इकबाल सिद्दिकी आणि शोएब अंसारी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणामुळे चिंचपाडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, वैद्यकीय क्षेत्रातील अशा प्रकारच्या गैरप्रकारांबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये ट्रान्सप्लांटसाठी प्रतीक्षा मोठी असल्याने अनेक रुग्ण खासगी पर्यायांचा विचार करतात. अशा वेळी विश्वासार्हतेच्या नावाखाली जर कोणी फसवणूक करत असेल, तर ते अत्यंत गंभीर आहे, असे स्थानिकांचे मत आहे. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या असहाय्य परिस्थितीचा फायदा घेत आर्थिक शोषण केले गेले असल्याचा आरोप या तक्रारीत आहे.
नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करून पीडितांना त्यांची रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच अशा प्रकारच्या प्रकरणांवर कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात इतर रुग्णांची फसवणूक होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare