जालन्यात शिक्षण विभागाच्या उडवा-उडवीमुळे नागरिकांचा संताप; जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

0
जालन्यात शिक्षण विभागाच्या उडवा-उडवीमुळे नागरिकांचा संताप; जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

जालन्यात शिक्षण विभागाच्या उडवा-उडवीमुळे नागरिकांचा संताप; जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

जालन्यात शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात संतप्त नागरिकाने जिल्हा परिषदेसमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. शिक्षक गैरहजेरी, शालेय साहित्य आणि पोषण आहाराच्या गैरव्यवस्थेविरोधात आंदोलन. पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला.

सायली मेमाणे

पुणे ३ ऑक्टोबर २०२५ : जालना जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या निष्काळजी कारभारामुळे संतप्त नागरिकाने जिल्हा परिषदेसमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाफराबाद तालुक्यातील माहोर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच शालेय साहित्य आणि पोषण आहाराचे योग्य वाटप होत नसल्याने पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच निष्काळजीपणाविरोधात शकील पठाण या नागरिकाने जिल्हा परिषदेपुढे संतप्तपणे आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शकील पठाण यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. परंतु, वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या उडवा-उडवीच्या वृत्तीमुळे हतबल झालेल्या पठाण यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना रोखले. पोलिसांच्या वेळेवरच्या हस्तक्षेपामुळे एक मोठा अनर्थ टळला.

या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाविरोधात नागरिक आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, पोषण आहार आणि आवश्यक शालेय साहित्य न मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक स्थिती अधिकच बिकट होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. शाळांमध्ये शिक्षकांची अनुपस्थिती ही दीर्घकाळची समस्या असून प्रशासन फक्त बैठका आणि पत्रव्यवहारापुरतेच मर्यादित असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले असून संबंधित शाळेच्या शिक्षकांविरोधात कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, या चौकशीच्या कारवाईवर कितपत ठोस निर्णय घेतला जाईल, याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये शंका कायम आहे.

या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामीण भागात अजूनही शिक्षकांची कमतरता, शैक्षणिक साधनांची अभावग्रस्तता आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा या समस्या कायम असल्याचे वास्तव उघड झाले आहे. शिक्षण क्षेत्रात उत्तरदायित्व आणि पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

जालना जिल्ह्यातील या प्रकाराने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले असून, शिक्षण क्षेत्रातील प्रशासनिक अपयशाचे हे आणखी एक उदाहरण असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *