ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राधान्य द्या; खासदार संजय दिना पाटील यांचा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश

0
ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राधान्य द्या; खासदार संजय दिना पाटील यांचा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश

ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राधान्य द्या; खासदार संजय दिना पाटील यांचा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश

विक्रोळीतील क्रिकेट स्पर्धेत खासदार संजय दिना पाटील यांनी युवकांना ड्रग्जपासून दूर राहून क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळण्याचे आवाहन केले. व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृतीवर भर.

पुणे २७ मे २०२६ : वाढत्या ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुण पिढीला योग्य दिशा मिळावी आणि युवकांनी व्यसनापासून दूर राहून क्रीडा व सकारात्मक उपक्रमांकडे वळावे, या उद्देशाने विक्रोळीतील टागोरनगर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्व. दिना बामा प्रतिष्ठान आणि सैयद अझरुद्दीन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने युवक, स्थानिक नागरिक आणि क्रिकेटप्रेमींनी सहभाग घेतला.

या स्पर्धेच्या माध्यमातून “ड्रग्जला नाही, क्रीडेला होकार” असा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देण्यात आला. ईशान्य मुंबईत वाढत्या ड्रग्जच्या समस्येमुळे अनेक युवक चुकीच्या मार्गाला लागल्याची चिंता व्यक्त होत असताना, अशा क्रीडा स्पर्धांद्वारे युवकांना सकारात्मक ऊर्जा आणि योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्पर्धेच्या अंतिम सामन्याला ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी बोलताना खासदार संजय दिना पाटील यांनी युवकांना ड्रग्जपासून दूर राहण्याचे आवाहन केले. “व्यसनामुळे केवळ व्यक्ती नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. युवकांनी शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊन आपले भविष्य घडवावे,” असे ते म्हणाले.

ईशान्य मुंबई परिसरात वाढत्या ड्रग्जच्या समस्येविरोधात संजय दिना पाटील यांनी यापूर्वीही अनेकदा आवाज उठवला आहे. पोलिस प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी अवैध ड्रग्ज व्यवहारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.

युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ड्रग्जमुळे समाज आणि देशाच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होत असून, तरुण पिढीला वाचवण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने युवकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही संजय दिना पाटील यांनी नमूद केले. अनेक गुणवंत खेळाडूंना आर्थिक अडचणींमुळे संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत स्थानिक स्तरावर स्पर्धा आयोजित करून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रामुळे युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार निर्माण होतात. त्यामुळे समाजात क्रीडा संस्कृती वाढीस लागणे ही काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे युवकांमध्ये व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा निर्माण होऊन समाजात सकारात्मक संदेश पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed