दिवाळीनंतरही महाराष्ट्रात पावसाची बॅटिंग सुरुच; पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा
दिवाळीनंतरही महाराष्ट्रात पावसाची बॅटिंग सुरुच; पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन.
सायली मेमाणे
पुणे २५ ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्रात दिवाळीनंतरही पावसाची बॅटिंग सुरू राहणार आहे. पुणे वेधशाळेच्या हवामान अंदाजानुसार, 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे होणाऱ्या संभाव्य धोका लक्षात घेऊन योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.
यावर्षी मे महिन्यात सुरु झालेला पाऊस अजूनही राज्यात मोकळा राहिला नाही. मान्सूनने राज्याला रामराम ठोकले असून, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात वादळी पाऊस, कडकडाटासह गडगडाट आणि मध्यम ते जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, लक्ष्मीपूजनानंतरच्या दोन दिवसांत, म्हणजे 23 आणि 24 ऑक्टोबरला मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता होती. छत्रपती संभाजीनगर शहरात 25 ते 27 ऑक्टोबर दरम्यान पावसाची अपेक्षा आहे. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, 28 ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता आहे.
जिल्हेवार अंदाजानुसार, 25 ऑक्टोबरला नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, वर्धा आणि नागपूरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 26 ऑक्टोबरला मुंबई, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पाऊस अपेक्षित आहे. 27 ऑक्टोबरला धुळे, मुंबई, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची शक्यता आहे. तर 28 ऑक्टोबरला पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि नांदेडमध्ये पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आगाऊ खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वारा यामुळे विजेच्या झटक्यांनी होणारे धोके टाळण्यासाठी घरातील आणि शेतातील सुरक्षितता सुनिश्चित करणे गरजेचे आहे. नागरिकांनी वाहतूक आणि रस्त्यांवरील सुरक्षेबाबत दक्ष राहावे. शेतकऱ्यांनी शेतीतील पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीचे उपाययोजना कराव्यात.