द्रास लष्करी तळावर ‘लेझर शो’साठी महाराष्ट्र सरकारकडून 3 कोटींची मदत; कारगिल ‘शौर्यथॉन’मध्ये एकनाथ शिंदे यांचा सहभाग
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लष्कराचे कोअर लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हाती हा धनादेश सुपूर्द केला.
कारगिलच्या द्रासमध्ये भारतीय सैन्याच्या शौर्याचे स्मरण करणाऱ्या ‘लेझर शो’साठी महाराष्ट्र शासनाची तीन कोटींची मदत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शौर्यथॉन-2025’ स्पर्धेला दिला हिरवा झेंडा.
२३ जून २०२५ : कारगिल युद्धभूमी द्रास येथे भारतीय सैन्याच्या शौर्याचे दर्शन घडवणाऱ्या ‘लेझर शो’च्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने 3 कोटी रुपये निधी दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लष्कराचे कोअर लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हाती हा धनादेश सुपूर्द केला. मागील वर्षी मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी ही घोषणा केली होती, ती आज प्रत्यक्षात आली.
ही मदत कारगिलमध्ये आयोजित ‘सरहद शौर्यथॉन-2025’ या विशेष मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने दिली गेली. या स्पर्धेचे उद्घाटनही एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे कारगिल युद्धातील भारतीय जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून देशभक्ती जागवणे. या मॅरेथॉनमध्ये देशभरातून आलेल्या सुमारे 3,000 धावपटूंनी सहभाग घेतला. समुद्रसपाटीपासून 10,800 फूट उंचीवर ही मॅरेथॉन पार पडली.
या शौर्यथॉनमध्ये चार प्रमुख श्रेणी होत्या — 21.097 किमीची ‘ऑपरेशन विजय दौड’, 10 किमीची ‘टोलोलिंग दौड’, 5 किमीची ‘टायगर हिल दौड’ आणि 3 किमीची ‘फ्युचर हिरोज दौड’. सर्व विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ही मॅरेथॉन ‘सरहद संस्था’च्या पुढाकाराने आणि भारतीय लष्कर, पुणे येथील स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पर्धेनंतर ‘ऑपरेशन विजय’मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीस्थळाला भेट देत त्यांना मानवंदना अर्पण केली. त्यानंतर त्यांनी कारगिल युद्ध संग्रहालयालाही भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमात सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाविषयी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “कारगिलच्या शौर्याची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी म्हणून लेझर शोची निर्मिती महत्त्वाची आहे. तसेच ‘शौर्यथॉन’मुळे देशभक्तीचे बळ नागरिकांच्या मनात अधिक रुजते. ही स्पर्धा केवळ धावण्याची नव्हे, तर आपल्या सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना सलाम करण्याची आहे.”
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz