पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना ‘चिकन मसाला’ दिवाळी गिफ्ट; वारकरी संप्रदायात संतापाची लाट

0
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना ‘चिकन मसाला’ दिवाळी गिफ्ट; वारकरी संप्रदायात संतापाची लाट

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना ‘चिकन मसाला’ दिवाळी गिफ्ट; वारकरी संप्रदायात संतापाची लाट

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून दिवाळीनिमित्त चिकन मसाला भेट देण्यात आला आहे. या प्रकारावर वारकरी संप्रदायातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सायली मेमाणे

पुणे १८ ऑक्टोबर २०२५ : पंढरपूर – महाराष्ट्रातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक वादग्रस्त प्रकार घडल्याने वारकरी संप्रदायात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून दिवाळीनिमित्त ‘चिकन मसाला’ भेट देण्यात आली असून, ही घटना उघड झाल्यानंतर सामाजिक माध्यमांवर संतापाची लाट उसळली आहे.

विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायाचं आध्यात्मिक केंद्र मानलं जातं. या संप्रदायात शाकाहाराला सर्वोच्च स्थान आहे. भक्तिगायन, नामस्मरण आणि अहिंसा या तत्वांवर आधारित वारकरी परंपरेत मांसाहार आणि मद्यपानाला स्थान नाही. अशा पार्श्वभूमीवर मंदिरातील कर्मचाऱ्यांना ‘चिकन मसाला’ भेट देण्यात आल्याने हे मंदिराच्या परंपरेला विरोधात जाणारं पाऊल मानलं जात आहे.

बीव्हीजी कंपनीकडून विठ्ठल मंदिरासाठी सुरक्षारक्षक आणि अन्य कर्मचारी ‘आउटसोर्सिंग’ पद्धतीने उपलब्ध करून दिले जातात. याच कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून चिकन मसाला देण्यात आला. ही माहिती समोर आल्यानंतर स्थानिक वारकरी, भक्त आणि समाजमाध्यमांवरील वापरकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “धार्मिक स्थळाशी निगडित कर्मचाऱ्यांना अशा भेटवस्तू देणं योग्य आहे का?”

सोशल मीडियावर या घटनेबाबतचे फोटो आणि पोस्ट्स व्हायरल होत आहेत. काहींनी या कृतीला “असंवेदनशील आणि धार्मिक भावनांचा अपमान” असे संबोधले आहे. तर काही वारकऱ्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, मंदिर प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, स्थानिक स्तरावर हा मुद्दा राजकीय व धार्मिक चर्चेचा विषय ठरला आहे. बीव्हीजी कंपनीकडून ही भेट सर्व कर्मचाऱ्यांना समान स्वरूपात दिली गेल्याचं सांगितलं जात असलं, तरी पंढरपूरसारख्या धार्मिक स्थळासाठी हा निर्णय अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

दिवाळी हा आनंद, एकोपा आणि प्रकाशाचा सण मानला जातो. परंतु या घटनेमुळे विठ्ठल भक्तांमध्ये भावनिक असंतोष निर्माण झाला आहे. “वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा विचार न करता घेतलेले निर्णय भविष्यात अधिक सावधपणे घेतले जावेत,” अशी मागणी वारकरी समाजाकडून होत आहे.

या प्रकाराने धार्मिक संवेदनशीलतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सणाच्या पार्श्वभूमीवरही मंदिर परिसरात या वादाची चर्चा सुरू आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed