पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना वेग पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि सायबर सुरक्षेसाठी मोठे निर्णय

पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना वेग पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि सायबर सुरक्षेसाठी मोठे निर्णय
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, सायबर सुरक्षा आणि नव्या क्षेत्रीय कार्यालयासह विविध विकासकामांना मंजुरी दिली.
पुणे, ४ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना अधिक सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी दिली आहे. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, बीआरटीएस, आरोग्य सेवा, सायबर सुरक्षा आणि प्रशासकीय सुविधांशी संबंधित अनेक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उच्च क्षमतेच्या नव्या डी.आय. जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. याशिवाय बोपखेल, दिघी, पिंपळे निलख, थेरगाव, वाकड, श्रीनगर, चिखली आणि जाधववाडी या भागांतील पाण्याच्या टाक्या, पंपिंग केंद्रे आणि वितरण वाहिन्यांच्या परिचालन व देखभालीची कामे एकात्मिक पद्धतीने केली जाणार आहेत. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी कुशल मनुष्यबळ आणि टँकर चालक उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली.
शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी नाशिक फाटा उड्डाणपुलाची स्थापत्य दुरुस्ती तसेच नाशिक फाटा ते वाकड या कॉरिडॉर क्रमांक ३ रस्त्याची डागडुजी करण्यात येणार आहे. औंध-रावेत बीआरटीएस मार्गाचे मूल्यमापन करून बसथांब्यांचे आधुनिकीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा परिसरासाठी उच्चदाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार असून, परिसरात फसाड लाईटिंग, सीसीटीव्ही, अग्निशामक यंत्रणा आणि आधुनिक विद्युत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
आरोग्य क्षेत्रातही महापालिकेने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांच्या हाडांच्या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स खरेदी करण्यात येणार आहेत. कान, नाक आणि घसा विभागातील अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या वार्षिक देखभालीलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.
डिजिटल प्रशासनाच्या वाढत्या वापरासोबतच सायबर सुरक्षेला प्राधान्य देत महापालिकेच्या संगणक यंत्रणेसाठी तीन हजार अँटी-व्हायरस परवाने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच तांत्रिक मदतीसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या डिजिटल प्रणालींचे संरक्षण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महापालिकेच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या ‘लोहगड’ या नव्या क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांसाठी सभागृह, विविध विभागांची कक्ष, कॅश काउंटर आणि अधिकारी दालने विकसित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शहरात दोन लाख देशी वृक्षांची लागवड आणि डीपी रस्त्यांचे सुशोभीकरण प्रभावीपणे राबवण्यासाठी उद्यान विभागात अनुभवी अधिकाऱ्यांची तात्पुरती पुनर्नियुक्ती करण्यात येणार आहे.
याशिवाय प्रभाग क्रमांक १२ आणि १ मधील सार्वजनिक उत्सवांच्या व्यवस्थेसाठी आवश्यक निर्णय घेण्यात आले असून, ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ सात दिवस व्यापक स्वरूपात आयोजित करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, पर्यावरण आणि डिजिटल प्रशासन या सर्व क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले.
Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare