पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई! ‘डिजिटल अरेस्ट’ रॅकेटचा पर्दाफाश; ४ राज्यांतून ६ आरोपी अटक
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई! ‘डिजिटल अरेस्ट’ रॅकेटचा पर्दाफाश; ४ राज्यांतून ६ आरोपी अटक
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने ज्येष्ठ नागरिकांना फसवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली. तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि मुंबईतून ६ आरोपी पकडले; ७ कोटी ८६ लाखांचा घोटाळा उघड.
सायली मेमाणे
१३ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सायबर गुन्ह्यांविरोधात आणखी एक मोठी आणि महत्त्वाची कारवाई करत ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावावर देशभरातील नागरिकांना फसवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणारी ही टोळी ब्ल्यू डार्ट कंपनीचा अधिकारी किंवा मुंबई पोलीस असल्याचे भासवून, “तुमच्यावर गुन्हा दाखल आहे,” असे सांगत भीती निर्माण करत असे. त्यानंतर पीडितांकडून मोठ्या रकमा उकळल्या जात. या टोळीने तब्बल २ कोटी ८० लाखांची फसवणूक केल्याचे पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणातील आरोपींचा शोध घेताना पोलिसांनी तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि मुंबई असा हजारो किलोमीटरचा प्रवास केला. गुन्हेगारी नेटवर्कचे धागेदोरे मिळवण्यासाठी पोलिसांनी विविध राज्यांतील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, बँक व्यवहारांचे विश्लेषण आणि कॉल रेकॉर्ड यांचा सखोल अभ्यास केला. या सर्व तपास प्रक्रियेच्या आधारे सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्या आरोपींमध्ये मोहम्मद आमेर अखिल मोहम्मद आरिफ, जिगर जितेश पटेल, अजिथ विजयन, सचिन पी प्रकाश, मोहम्मद रिहान मोहम्मद तजमूल आणि सय्यद ओवेझ आफनान सय्यद शौकत यांचा समावेश आहे.
या आरोपींच्या नावावर देशभरातून तब्बल ३१ तक्रारी दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या बँक खात्यांवरील व्यवहारांमध्ये ७ कोटी ८६ लाखांहून अधिक रकमेची हालचाल आढळून आल्याने या टोळीचे आर्थिक जाळे किती मोठे आहे, याचा अंदाज येतो. पोलिसांच्या मते, ही टोळी वेगवेगळ्या राज्यात कार्यरत असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सामान्य नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव करून धमकावत असे. पीडितांना त्यांचे WhatsApp, फोन किंवा ईमेलवर एक लिंक किंवा व्हिडिओ कॉल पाठवला जाई आणि “तुमचा पासपोर्ट, आधार, पॅन कार्ड गुन्ह्यात वापरले गेले आहे” असे सांगून भयभीत केले जाई.
भितीदायक संभाषणानंतर पीडितांना त्यांच्या बँक खात्यातील रक्कम “सुरक्षित ठेवण्यासाठी” टोळीने सांगितलेल्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जात असे. या पद्धतीने त्यांनी अनेक राज्यांमध्ये लाखो-कोटींची फसवणूक केली होती. त्यांच्या व्यवहारांमध्ये विदेशी गुन्हेगारी नेटवर्कशी देखील संपर्क असल्याचा संशय असल्याने पोलिसांकडून तपास अधिक विस्तारला जात आहे.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणूक प्रकारांना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही पोलीस किंवा कुरिअर कंपनीकडून व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’सारखी संकल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जर कोणताही अनोळखी व्यक्ती अशाप्रकारे धमकी देत असेल तर तत्काळ 1930 या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा, अशी सूचना देण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, दीपक भोसले, विनायक म्हसकर आणि हेमंत खरात यांनी या मोहिमेत महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.
या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सायबर गुन्ह्याविरोधातील आपली क्षमता सिद्ध केली असून, ‘डिजिटल अरेस्ट’ रॅकेटला मोठा धक्का दिला आहे.