पुणे शहरात जुना मोटर स्टॅन्ड परिसरातून पिस्तूलसह युवक जेरबंद; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
पुण्यात अवैध पिस्तूलसह तरुण अटकेत; युनिट-१ गुन्हे शाखेची कारवाई
पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ ने भवानीपेठ येथून पिस्तूल व ६ जिवंत काडतुसांसह एक युवक अटक केला. विनापरवाना अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे ३१ जुलै २०२५ : पुणे शहरातील युनिट-१, गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका २० वर्षीय तरुणास भवानी पेठेतील मटण मार्केटजवळ अटक केली आहे. सदर आरोपीकडून ₹४०,००० किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल व ₹६,००० किंमतीच्या सहा जिवंत काडतुसांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
२९ जुलै २०२५ रोजी पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, जितु रवि मंडलिक नावाचा युवक गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने जुन्या मोटर स्टँडजवळ थांबलेला आहे. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाडगे यांनी त्वरित पथकास कारवाईचे आदेश दिले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरुणाच्या अंगझडतीत त्याच्या पॅन्टच्या आतील बाजूस कंबरेजवळ गावठी पिस्तूल सापडले. तसेच खिशात सहा जिवंत काडतुसे देखील आढळली. आरोपीने आपले नाव जितु रवि मंडलिक (वय २० वर्षे) असून साईट अपार्टमेंट, काकडे वस्ती, कोंढवा येथे राहत असल्याचे सांगितले.
खडक पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गु.र.नं. ३९७/२०२५ प्रमाणे आर्म्स अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(२)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही महत्त्वपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, सपोनि दिपक बर्ग, पोलीस अंमलदार राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, निलेश साबळे, शुभम देसाई आणि उमेश मठपती यांनी ही धाडसी कारवाई केली.
पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे भवानी पेठ परिसरात संभाव्य गंभीर गुन्हा टळला असून, पोलीस दलाच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास बळावला आहे.