पुण्यातील काळेपडळ पोलिसांची कारवाई: 15 लाख रुपयांची चोरी करणारा फरार चालक अटक
पुण्यातील काळेपडळ पोलिसांची कारवाई: 15 लाख रुपयांची चोरी करणारा फरार चालक अटक
पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनची मोठी कारवाई, मालकाचे 15 लाखांहून अधिक रक्कम चोरी करणाऱ्या फरार चालकाला ठाण्यातून अटक. मुद्देमाल जप्त.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे ३१ जुलै २०२५ : पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनने एका गंभीर चोरीच्या गुन्ह्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. फिर्यादीकडून मजुरांच्या पगारासाठी आणलेली रोख रक्कम गाडीतूनच चोरी करून फरार झालेला चालक सलमान यासीन पठाण (वय ३२) याला पोलिसांनी अखेर ठाण्यातून अटक केली आहे.
आरोपीने गुन्हा केल्यानंतर आपले मोबाईल बंद ठेवत सातत्याने ठिकाणं बदलून तपास यंत्रणांना चकवा दिला. त्याने मिरज-सांगली, बीड, पुणे ग्रामीण, मुंबई, मुंब्रा आणि ठाणे परिसरात लपून फिरणे सुरू ठेवले होते. मोबाईलचा वापर न करता तो इतर लोकांचे फोन घेऊन नातेवाईकांशी संपर्क करत असल्याने पोलिसांना शोध घेण्यात अडचणी येत होत्या.
मात्र, पोलिस हवालदार प्रतिक लाहिगुडे यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचे लोकेशन मिळवण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी शिळडायघर पोलीस स्टेशन, मुंब्रा येथे आरोपीचा शिताफीने पाठलाग करून त्याला मित्राच्या मदतीने अटक केली. अटकेनंतर आरोपीकडून १५ लाख ६ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, ज्यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, चारचाकी गाडी आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे आणि त्यांच्या पथकाने शिताफीने ही अटक केली. ही घटना पुणे पोलिसांची यशस्वी कामगिरी ठरली आहे.