वडगावमध्ये खुलेआम अमली पदार्थांची विक्री; तरुणाई संकटात, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

वडगावमध्ये खुलेआम अमली पदार्थांची विक्री; तरुणाई संकटात, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष
वडगाव मावळमध्ये खुलेआम ड्रग्स, गांजा व गुटख्याची विक्री सुरू असून अनेक तरुण अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकले आहेत. पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांत चिंता.
सायली मेमाणे
पुणे ३१ जुलै २०२५ : वडगाव मावळ हे मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेले शहर असून येथे गेल्या काही काळात अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. स्थानिक नागरिक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त करत या समस्येविरोधात पोलिस प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. ड्रग्स, गांजा, गुटखा आणि इतर अंमली पदार्थांची विक्री कुडे वाडा, मातोश्री चौक, सरदार महादजी शिंदे उद्यान परिसर, दिग्विजय कॉलनी, तळेगाव-वडगाव फाटा, आणि केशवनगर परिसरात सर्रासपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
शाळा, महाविद्यालय, सरकारी व निमसरकारी कार्यालये, आणि क्रीडा प्रतिष्ठान असलेल्या वडगाव शहरात तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असल्याने गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठेवर परिणाम होत आहे. ही बाब गंभीर असून पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष चिंतेची बाब बनली आहे.
स्थानिक भाजप शहराध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी वडगाव पोलिस निरीक्षकांना निवेदन देत त्वरित कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शाळा-महाविद्यालयाजवळील पान टपऱ्या व संशयित दुकाने तपासावीत, अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने लक्ष घालून वडगावच्या शांततेसाठी आणि तरुण पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी निर्णायक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter