पुण्यातील ७५वर्षांचा साक्षीदार इतिहासजमा! बंडगार्डन पोलिस ठाणे लवकरच पाडले जाणार, जागा रिकामी करण्याचा आदेश

पुण्यातील 75 वर्षांचा साक्षीदार इतिहासजमा! बंडगार्डन पोलिस ठाणे लवकरच पाडले जाणार,
पुण्यातील ७५ वर्षे जुने बंडगार्डन पोलिस ठाणे लवकरच पाडले जाणार असून, नवीन जागी आधुनिक सुविधांसह स्थलांतर करण्यात येणार आहे. अधिकृत आदेशानुसार, जागा एक आठवड्यात रिकामी होणार. वाचा सविस्तर माहिती.
सायली मेमाणे
२७ जून २०२५ : Bundgarden Police Station: पुण्यातील ऐतिहासिक आणि 75 वर्षांपासून कार्यरत असलेले बंडगार्डन पोलिस ठाणे लवकरच इतिहासजमा होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेली ही जुनी इमारत येत्या दोन आठवड्यांत पाडण्यात येणार आहे. यासाठी पुणे पोलिस दलाकडून तातडीने नवीन जागेचा शोध सुरू करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाने एक आठवड्याच्या आत सध्याची जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.
ही इमारत १९५१ साली वानवडी पोलिस ठाण्याचे विभाजन करून उभारण्यात आली होती. त्यावेळी पुण्यात पोलिस आयुक्तालय नव्हते, तर अधीक्षक कार्यालय होते. बंडगार्डन ठाण्याचा परिसर २००८ मधील कॉमनवेल्थ यूथ गेम्सपूर्वी बऱ्यापैकी विस्तृत होता. त्यावेळी निलगिरीची झाडं, हरित पट्टा आणि मोठा पोर्च होता. मात्र, रस्ते रुंदीकरणाच्या प्रकल्पामुळे आता ठाण्याच्या फक्त जुनी इमारत आणि थोडी जागा उरली आहे.
ही इमारत स्थापत्यशास्त्रीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जाते, कारण येथे आजही लाकडी जिने आणि लाकडी मजले आहेत, जे जुन्या काळातील बांधकामशैलीचे जिवंत उदाहरण आहेत.
या ऐतिहासिक इमारतीच्या जागी नव्याने जिल्हाधिकारी कार्यालयासाठी विकास केला जाणार आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाडकाम करण्यात येईल. दरम्यान, सेंट्रल बिल्डिंगसमोर नव्या पोलिस ठाण्याच्या उभारणीसाठी २९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नवीन इमारत पूर्ण होईपर्यंत तात्पुरते ठाण्याचे कामकाज सोमवार पेठेतील पोलिस वसाहतीत हलवले जाईल. त्यानंतर हे सेंट्रल बिल्डिंगसमोर नवीन इमारतीत स्थलांतरित केले जाईल.” मात्र, एक आठवड्यात पूर्ण स्थलांतर करणे पोलिस दलासाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
बंडगार्डन पोलिस ठाण्याचा जुना इतिहास पाहता, या ठिकाणी अनेक महत्त्वाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. ही इमारत पुणे शहरातील गुन्हेगारी इतिहासाची साक्ष देणारी असून, अनेक गुन्ह्यांचे तपास या ठिकाणाहून सुरू झाले होते.
नवीन इमारतीमध्ये आधुनिक सुविधा आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश असेल, अशी माहितीही पोलिस विभागाने दिली आहे. हे ठाणे स्थलांतरित होत असले तरी त्याचा ऐतिहासिक वारसा कायम राहणार आहे.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, “बंडगार्डन पोलिस ठाणे ही इमारत जुन्या स्थापत्यशैलीचे उदाहरण आहे. ती नव्याने बांधली जाईल आणि आधुनिक सुविधांनी युक्त असेल. आम्ही नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सदैव तत्पर आहोत.”
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter