पुण्यात मातामृत्यूदरात मोठी घट वेळेवर तपासणी आणि सुरक्षित प्रसूतीचे यश

पुण्यात मातामृत्यूदरात मोठी घट वेळेवर तपासणी आणि सुरक्षित प्रसूतीचे यश
पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या उपाययोजनांमुळे मातामृत्यूदर १२२ वरून ७७ पर्यंत घसरला. गर्भवतींची वेळेवर तपासणी, हाय-रिस्क ओळख आणि सुरक्षित प्रसूती ठरल्या प्रभावी.
पुणे ११ मे २०२६ : मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिका च्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत शहरातील मातामृत्यूदरात सातत्याने लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. सुरक्षित मातृत्वासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आता आकडेवारीत स्पष्ट दिसत आहेत. गर्भवतींची वेळेवर तपासणी, उच्चजोखीम गर्भधारणांची (हाय-रिस्क) लवकर ओळख, शासकीय रुग्णालयांतील सुरक्षित प्रसूती आणि प्रसूतीनंतरची देखरेख या घटकांमुळे अनेक मातांचे जीव वाचत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, २०२३-२४ मध्ये शहरात ७९ मातामृत्यू झाले होते. त्यानंतर २०२४-२५ मध्ये हा आकडा ६७ वर आला आणि २०२५-२६ मध्ये तो आणखी घटून ४५ पर्यंत पोहोचला. मातामृत्यूदर (MMR) देखील १२२ वरून ७७ पर्यंत खाली आला आहे. ही घसरण केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, प्रत्यक्षात सुरक्षित मातृत्वासाठी उचललेल्या पावलांचे यश म्हणून पाहिली जात आहे. पुणे हे राज्यातील मोठे उपचार केंद्र असल्याने इतर जिल्ह्यांमधूनही गंभीर रुग्ण येथे येतात, त्यामुळे आकडेवारीवर त्याचा काही प्रमाणात परिणाम होतो; तरीही घट सातत्याने होत राहणे ही महत्त्वाची बाब मानली जात आहे.
गर्भवती महिलांसाठी नियमित आरोग्य तपासण्या, आयर्न आणि फॉलिक ॲसिड गोळ्यांचे वितरण, मोफत रक्ततपासण्या, प्रसूतीपूर्व समुपदेशन आणि सुरक्षित प्रसूतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेषतः हाय-रिस्क प्रेग्नन्सी असलेल्या महिलांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. वेळेत निदान आणि योग्य वेळी रुग्णालयात दाखल करणे यामुळे गुंतागुंत टाळता येत आहे. शहरातील ९१.३ टक्के प्रसूती रुग्णालयात होत असल्याची नोंदही आश्वासक आहे. त्यापैकी ५४.३ टक्के प्रसूती खासगी रुग्णालयांत, ३७ टक्के शासकीय रुग्णालयांत, तर ८.७ टक्के प्रसूती इतर किंवा घरी होत आहेत.
तथापि, प्रसूतीनंतरचा काळ अजूनही चिंतेचा विषय ठरत आहे. २०२५-२६ मधील ४५ मातामृत्यूंपैकी ३४ मृत्यू हे प्रसूतीनंतर झाल्याचे समोर आले आहे. अतिरक्तस्राव, रक्तदाबातील गुंतागुंत, वेळेत उपचार न मिळणे आणि उशिरा रुग्णालयात दाखल होणे ही प्रमुख कारणे असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे. त्यामुळे प्रसूतीनंतरच्या ४८ तासांपासून पुढील काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली राहणे किती आवश्यक आहे, यावर तज्ज्ञांनी भर दिला आहे.
वयोगटानुसार पाहता, २० ते ३० वयोगटातील मातामृत्यूंची संख्या सर्वाधिक असली तरी त्यातही सातत्याने घट दिसून येते. २०२३-२४ मध्ये या गटात ५० मृत्यू नोंदले गेले होते, जे २०२५-२६ मध्ये ३० वर आले. ३० वर्षांवरील गटात २५ वरून ११ पर्यंत घट झाली, तर २० वर्षांखालील गटातही संख्या कमी झाली आहे. दरवर्षी अपेक्षित गर्भधारणा सुमारे ९६,१३८ इतकी असून, जिवंत जन्मांची संख्या ५८,२१८ आहे.
‘आई सुरक्षित असेल, तर कुटुंब सुरक्षित राहते,’ हा संदेश अधोरेखित करत आरोग्य तज्ज्ञांनी गर्भधारणेपासून प्रसूतीनंतरच्या काळापर्यंत सातत्याने वैद्यकीय तपासणी आणि जागरूकतेचे महत्त्व पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. मातृदिनाच्या निमित्ताने सुरक्षित मातृत्वाबाबत जनजागृती वाढविणे आणि प्रत्येक गर्भवतीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हीच पुढील मोठी जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare