पुण्यात 2 कोटींच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी उधळली; तिघांना अटक, वनविभागाची धडाकेबाज कारवाई

0
पुण्यात 2 कोटींच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी उधळली; तिघांना अटक, वनविभागाची धडाकेबाज कारवाई

पुण्यात 2 कोटींच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी उधळली; तिघांना अटक, वनविभागाची धडाकेबाज कारवाई

पुण्यात स्पर्म व्हेल माशाच्या अंबरग्रीस तस्करी प्रकरणात वन विभागाची मोठी कारवाई. 2 कोटींच्या दोन किलो व्हेल माशाच्या उलटीसह तिघांना अटक, एक फरार. वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद.

सायली मेमाणे

पुणे २७ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरात वनविभागाने केलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल दोन कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीस जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे. पुण्यातील कोथरूड-चांदणी चौक परिसरात गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. वनविभागाने एका चारचाकी वाहनातून दोन किलो अंबरग्रीस हस्तगत केली.

स्पर्म व्हेल माश्याच्या पोटातून तयार होणारी उलटी आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात प्रचंड किमतीत विकली जाते. परफ्यूम उद्योगात याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, कारण यामुळे तयार होणारा सुगंध टिकाऊ आणि महागडा असतो. त्यामुळे या वस्तूची बेकायदेशीर तस्करी जगभर होत असते. भारतातसुद्धा अशा अनेक प्रकरणांचा उलगडा झाला आहे आणि पुण्यातील ही कारवाई त्यातलीच आणखी एक मोठी कामगिरी ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाला अंबरग्रीस तस्करीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपींना पकडण्यात आले. कारवाईदरम्यान वन अधिकार्‍यांनी इनोव्हा कार जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना सुरुवातीला तीन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने त्यांची कोठडी वाढवली आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.

या प्रकरणात आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 2(32), 9, 39, 44, 48 (A), 49, 50 आणि 51 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास कठोर शिक्षा होऊ शकते.

पुणे वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंबरग्रीसचा वापर केवळ परफ्यूम उद्योगात नव्हे तर काही ठिकाणी औषधी गुणधर्मांसाठीदेखील होतो, पण त्याची विक्री व साठवणूक बेकायदेशीर असल्याने अशा तस्करीविरोधात कठोर कारवाई केली जाते. अंबरग्रीसची मागणी जास्त असल्याने हे रॅकेट दूरवर पसरलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते आणि विभागीय वनअधिकारी अमोल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक वनसंरक्षक विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, फिरते पथक अधिकारी ऋषिकेश चव्हाण आणि पुणे वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा यशस्वी तपास पार पडला.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की अंबरग्रीससारख्या बेकायदेशीर व्यापारामध्ये मोठा पैसा गुंतलेला आहे. अशा कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव वारंवार येते. वन्यजीव संरक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी अशा प्रकारच्या तस्करीवर आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे. पुण्यातील ही कारवाई केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाची ठरत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed