भारतात शिक्षणापेक्षा गुटख्यावर अधिक खर्च; सरकारी सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव उघड
भारतात शिक्षणापेक्षा गुटख्यावर अधिक खर्च; सरकारी सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव उघड
केंद्र सरकारच्या उपभोग खर्च सर्वेक्षणानुसार ग्रामीण भारतात शिक्षणापेक्षा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर अधिक खर्च होत असून गेल्या दशकात तंबाखूवरील खर्चात मोठी वाढ झाली आहे.
पुणे 2५ जानेवारी २०२६ : भारताचा खरा चेहरा गावांमध्ये दिसतो, असे नेहमी सांगितले जाते. मात्र, केंद्र सरकारच्या ताज्या घरगुती उपभोग आणि खर्च सर्वेक्षणातून (HCES) ग्रामीण भारतातील एक चिंताजनक वास्तव समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भारतात शिक्षणावर होणाऱ्या खर्चापेक्षा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर अधिक पैसा खर्च केला जात आहे. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे मानले जात असताना, ही आकडेवारी देशाच्या भविष्यासाठी गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.
सर्वेक्षणानुसार ग्रामीण कुटुंबे त्यांच्या एकूण खर्चापैकी केवळ २.५ टक्के खर्च शिक्षणावर करतात, तर तब्बल ४ टक्के खर्च तंबाखूजन्य पदार्थांवर, विशेषतः गुटख्यावर केला जातो. म्हणजेच शिक्षणापेक्षा व्यसनावर अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट होते. १ फेब्रुवारीपासून तंबाखूजन्य पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता असतानाच हे सर्वेक्षण समोर आल्याने चिंता अधिक गडद झाली आहे.
२०११-१२ ते २०२३-२४ या कालावधीत ग्रामीण भागात प्रतिव्यक्ती तंबाखूवरील खर्चात तब्बल ५८ टक्क्यांची वाढ झाली आहे. शहरी भागात ही वाढ आणखी जास्त असून ती ७७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. सध्या ग्रामीण भागात दरमहा प्रतिव्यक्ती खर्चाच्या सुमारे १.५ टक्के रक्कम तंबाखूवर खर्च होत असून शहरी भागात हा खर्च सुमारे १ टक्का आहे. ही आकडेवारी पाहता, तंबाखूचा वापर केवळ वाढत नाही तर तो दैनंदिन खर्चाचा नियमित भाग बनत असल्याचे दिसून येते.
ग्रामीण भारतात तंबाखू वापरणाऱ्या कुटुंबांची संख्या २०११-१२ मध्ये ९.९ कोटी म्हणजेच ५९.३ टक्के होती. २०२३-२४ मध्ये ही संख्या वाढून १३.३ कोटींवर पोहोचली असून त्यांचे प्रमाण ६८.६ टक्के झाले आहे. म्हणजेच अवघ्या एका दशकात ग्रामीण भागात तंबाखू वापरणाऱ्या कुटुंबांमध्ये सुमारे ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
शहरी भागात ही स्थिती आणखी वेगाने बदलत आहे. शहरी भारतात तंबाखू वापरणारी कुटुंबे २०११-१२ मध्ये २.८ कोटी होती, ती २०२३-२४ मध्ये वाढून ४.७ कोटींवर पोहोचली आहेत. शहरी भागातील तंबाखू वापरणाऱ्या कुटुंबांचा वाटा ३४.९ टक्क्यांवरून ४५.६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यावरून तंबाखूचा प्रसार केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित राहिलेला नसल्याचे स्पष्ट होते.
सर्वेक्षणानुसार तंबाखूचा वापर आता कोणत्याही विशिष्ट प्रांत किंवा सामाजिक गटापुरता सीमित राहिलेला नाही. ग्रामीण भागात गुटखा आणि पानतंबाखूचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, तर शहरी भागात सिगारेटचा वापर वेगाने वाढत असून गुटखाही झपाट्याने पसरत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण सरासरीपेक्षा ३० टक्क्यांहून अधिक तंबाखू वापर आढळून आला आहे.
शिक्षणावर कमी आणि व्यसनांवर अधिक खर्च होणे ही केवळ आरोग्याचीच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक विकासाचीही गंभीर समस्या आहे. ही आकडेवारी ग्रामीण आणि शहरी भारतासमोर उभ्या असलेल्या आव्हानांचा आरसा दाखवणारी असून, तंबाखूविरोधी जनजागृती आणि शिक्षणाला अधिक प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित करते.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information