महाराष्ट्रात नवे मद्य परवाने वाटप; राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना मोठा लाभ

महाराष्ट्रात नवे मद्य परवाने वाटप; राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना मोठा लाभ
महाराष्ट्र सरकारने ४१ मद्यनिर्मिती उद्योगांना ३२८ परवाने दिले. यात सुमारे ३०% परवाने राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांना मिळाले असून वादाला तोंड फुटले आहे.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑगस्ट २०२५ : महाराष्ट्र सरकारने नुकताच घेतलेला निर्णय राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण करणारा ठरला आहे. राज्य सरकारने ४१ मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे ३२८ नवीन परवाने दिले आहेत. या निर्णयामागे सरकारी तिजोरीवरील भार कमी करण्याचे कारण देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात या परवान्यांपैकी तब्बल ३० टक्के म्हणजेच ९६ परवाने हे थेट राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांच्या झोळीत पडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चांना आणि आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
या यादीत भाजपसह इतर पक्षांशी संबंधित अनेक नेत्यांची नावे समोर आली आहेत. भाजपशी संबंधित पाच नेत्यांच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांना एकट्याने ४० परवाने मिळाले आहेत. यात दिवंगत डॉ. बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे यांच्या ‘डेल्टा डिस्टिलरीज’, पंकजा मुंडे यांचे पुत्र आर्यमन पालवे यांची ‘रॅडीको एन.व्ही. डिस्टिलरीज’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी संचालक असलेली ‘मानस ॲग्रो इंडस्ट्रीज’, आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याशी संबंधित ‘यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना’ आणि आमदार सुभाष देशमुख यांचे पुतणे महेश देशमुख संचालक असलेली ‘लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज’ या कंपन्यांचा समावेश आहे.
फक्त भाजपपुरतेच मर्यादित न राहता, इतर पक्षांतील नेत्यांच्या नातेवाईकांनाही या परवान्यांचा लाभ मिळालेला आहे. अजित पवार गटाचे माजी आमदार संजयमामा शिंदे संचालक असलेली ‘विट्ठल कार्पोरेशन’, माजी आमदार राजन पाटील यांचे व्यावसायिक भागीदार संचालक असलेली ‘नक्षत्र डिस्टिलरीज अँड ब्रुवरीज’, तसेच अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या व्यावसायिक भागीदाराची ‘ॲडलर्स बायो एनर्जी’ आणि ‘असोसिएटेड ब्लेंडर्स’ या कंपन्यांनाही परवाने देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे शरद पवार गटातील इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील अध्यक्ष असलेला ‘राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना’, माजी आमदार मानसिंग नाईक यांच्या पत्नी, पुत्र आणि कन्या संचालक असलेली ‘विराज अल्कोहोल्स’, तसेच पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सोनिया होळकर यांचे पती सत्यजित होळकर संचालक असलेली ‘ग्रेनॉच इंडस्ट्रीज’ यांनाही नव्या परवान्यांचा लाभ मिळणार आहे.
विशेष म्हणजे या ४१ उद्योगांपैकी तब्बल १६ कारखाने बंद अवस्थेत आहेत. काही कारखाने फक्त नावापुरते सुरू ठेवले गेले असून प्रत्यक्ष उत्पादन मर्यादित आहे. अशा परिस्थितीत नव्याने मिळणारे परवाने हे उद्योगांसाठी एक मोठा आर्थिक फायदा ठरणार आहेत. सरकारकडून मिळणारा प्रत्येक परवाना एक कोटी रुपयांना मिळतो आणि हे परवाने भाडेकरारावर देण्याची मुभा असल्याने मद्य उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची शक्यता आहे.
यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका सुरू झाली आहे. जनतेच्या हितासाठी म्हणून दिल्या जाणाऱ्या योजना आणि परवाने हे नेत्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी वापरले जात असल्याचे आरोप होत आहेत. तर सरकारने मात्र हा निर्णय तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगत आपले समर्थन कायम ठेवले आहे.
राजकीय नेते आणि त्यांचे कुटुंबीय यांना थेट लाभ देणाऱ्या या परवान्यांमुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील काही दिवसांत हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter