मोठा निर्णय! आता शाळांमध्ये आयुर्वेदाचं शिक्षण; विज्ञानाचा अभ्यासक्रम होणार बदलणार

मोठा निर्णय! आता शाळांमध्ये आयुर्वेदाचं शिक्षण; विज्ञानाचा अभ्यासक्रम होणार बदलणार
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अंतर्गत NCERT ने सहावी ते आठवीच्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमात आयुर्वेद विषयाचा समावेश केला आहे. आरोग्य, पोषण आणि पर्यावरण संतुलन भारतीय दृष्टिकोनातून शिकवण्याचा हा उपक्रम असून, UGC पातळीवरही आयुर्वेद अभ्यासक्रमाचा विस्तार होणार आहे.
सायली मेमाणे
पुणे ३० ऑक्टोबर २०२५ : शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवणारा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अंतर्गत आता NCERT च्या सहावी ते आठवीच्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमात आयुर्वेदाशी संबंधित प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य, पोषण आणि पर्यावरण संतुलनाचं महत्त्व भारतीय दृष्टिकोनातून समजावं, हा महत्त्वाचा हेतू आहे. या नव्या बदलामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समतोल साधण्याची दिशा मिळणार आहे.
NCERT चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी सांगितलं की, या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ वैज्ञानिक ज्ञान देणे नाही, तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी आवश्यक असलेल्या भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणे आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, नैसर्गिक उपचारपद्धती आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण होईल.
या बदलानुसार सहावीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात मूलभूत सिद्धांत आणि आयुर्वेदाशी संबंधित २० गुणांचं प्रकरण समाविष्ट करण्यात आलं आहे. तर आठवीच्या पाठ्यपुस्तकात ‘दिनचर्या’ आणि ‘ऋतुचर्या’ यासारख्या विषयांवर विशेष भर दिला आहे. या अध्यायांमधून विद्यार्थ्यांना ऋतूनुसार आहार-विहाराचे महत्त्व, शरीर-मन-पर्यावरणातील संतुलन, आणि आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आयुर्वेदीय पद्धती शिकवण्यात येणार आहेत.
तसेच, ‘Curiosity’ नावाचं नवं पुस्तक तयार करण्यात आलं असून, त्यामध्ये शरीर, मन आणि पर्यावरण यांच्यातील समन्वयावर एक स्वतंत्र अध्याय जोडण्यात येणार आहे. इयत्ता सहावीच्या विज्ञान शिक्षणात पदार्थांचे वर्गीकरण आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शिकवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी आधुनिक विज्ञानासोबतच भारतीय वैद्यक परंपरेचं मूलभूत ज्ञान आत्मसात करतील.
या नव्या धोरणामुळे केवळ शालेय स्तरावरच नव्हे, तर उच्च शिक्षणातही आयुर्वेदाचा विस्तार होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) लवकरच महाविद्यालयांमध्ये आयुर्वेद-केंद्रित अभ्यासक्रम सुरू करणार आहे. यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्यासाठी वर्कशॉप आणि ओरिएंटेशन प्रोग्राम्स आयोजित केले जाणार आहेत. या माध्यमातून भारताची प्राचीन चिकित्सा पद्धती शैक्षणिक क्षेत्रात नवे व्यासपीठ मिळवेल.
तज्ज्ञांच्या मते, आयुर्वेदावर आधारित शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढेल, तसेच त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन अधिक सखोल बनेल. भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित जीवनशैली आणि नैसर्गिक उपचारपद्धतींचे महत्त्व लहान वयात शिकल्यामुळे विद्यार्थी अधिक जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनतील.
या उपक्रमामुळे भारताचं पारंपरिक वैद्यक ज्ञान पुन्हा एकदा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन आयुर्वेद यांचा संगम साधणाऱ्या या नवीन शिक्षण मॉडेलमुळे विद्यार्थ्यांना अधिक व्यापक दृष्टिकोन मिळेल. शिक्षण क्षेत्रातील हा बदल केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता, भारतीय विचारसरणी आणि आरोग्य तत्त्वज्ञानाची पायाभरणी ठरणार आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter