मोठी बातमी! भाजप मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक, नेमकी कशावर चर्चा?
मोठी बातमी! भाजप मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची शक्यता.
सायली मेमाणे
पुणे ८ जुलै २०२५ : मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपमधील वरिष्ठ मंत्री आणि नेत्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सध्याच्या राज्यातील राजकीय हालचाली आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अधिक महत्त्वपूर्ण ठरली आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच भाजप नेत्यांनी या बैठकीसाठी वर्षावर एकत्र येणं हे निश्चितच लक्षवेधी ठरलं आहे.
या बैठकीला भाजपचे मंत्री, आमदार आणि काही महत्त्वाचे समन्वयक उपस्थित होते. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली, हे अधिकृतरित्या जरी जाहीर झालेलं नसले तरी उपलब्ध सूत्रांनुसार ही बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर केंद्रित होती, असा तर्क लावला जात आहे. पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये महानगरपालिका निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून निवडणुकीसाठी ठोस रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
या बैठकीची वेळ आणि पार्श्वभूमी विशेष महत्त्वाची ठरते कारण शनिवारी मुंबईत पार पडलेल्या विजयी मेळाव्यानंतर ही भाजपची पहिली बैठक आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — दोघेही उपस्थित होते. ही घटना जवळपास दोन दशकांनंतर पहिल्यांदाच घडली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या युतीधारकांसह आगामी निवडणुकांसाठीची योजना स्पष्ट करण्यासाठी ही बैठक घेतली असावी.
महायुतीतील इतर पक्षांशी समन्वय ठेवणे आणि एकत्र लढण्याच्या संधी निश्चित करणे, हेही या बैठकीत एक महत्त्वाचं उद्दिष्ट असावं, असं राजकीय वर्तुळांमध्ये बोललं जात आहे. अनेक महायुती नेत्यांनी सार्वजनिकरित्या युतीतून निवडणूक लढवणार असल्याचं संकेत दिले आहेत. पण महाविकास आघाडीच्या वाटाघाटी अद्याप पूर्ण स्पष्ट झालेल्या नाहीत. त्यामुळे भाजपने स्वबळावर किंवा ठोस युतीसह मैदानात उतरण्याची रणनीती आखल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय बैठकीत मंत्र्यांच्या कार्यप्रदर्शनाचा आढावाही घेण्यात आला असावा. अधिवेशनात आपली भूमिका अधिक प्रभावी ठेवण्यासाठी आणि जनतेसमोर सुस्पष्ट संदेश जाण्यासाठी मंत्र्यांनी आपल्या खात्यांची कामगिरी अधिक ठोस करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले असावेत. प्रशासनाकडून करण्यात येणारी पावसाळी तयारी, पूरस्थिती हाताळणी, आणि केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी यावरही काही चर्चा झाल्याची शक्यता आहे.
या बैठकीत नेमकं काय ठरलं हे जरी अधिकृतपणे समोर आलेलं नसलं तरी, आगामी महत्त्वाच्या निवडणुकांपूर्वी ही बैठक भाजपच्या दृष्टीने दिशा ठरवणारी असू शकते. ठाकरे-राज ठाकरे एकत्र आलेल्या पार्श्वभूमीवर भाजपने घेतलेलं हे पाऊल आगामी राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पाडू शकतं.