मोठ्या प्रकल्पांपेक्षा पाणी-स्वच्छता-आरोग्याला प्राधान्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे PCMC प्रशासनाला निर्देश

मोठ्या प्रकल्पांपेक्षा पाणी-स्वच्छता-आरोग्याला प्राधान्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे PCMC प्रशासनाला निर्देश
पिंपरी-चिंचवडमध्ये मूलभूत सुविधांवर भर देण्याचे खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश. अशुद्ध पाणीपुरवठा, १८५ किमी पाईपलाईन, टँकर लॉबी, मोकाट श्वानांसाठी GPS आणि पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवर भर.
पुणे ०७ एप्रिल २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरात भपकेबाज प्रकल्पांपेक्षा नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता आणि सक्षम आरोग्य सुविधा वेळेवर मिळणे अधिक महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करत खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला ठोस निर्देश दिले. विविध प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. बैठकीत पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य आणि शहरी स्वच्छतेसंबंधी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
ही बैठक पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंता, आरोग्य अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. शहरातील मूलभूत सेवांबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असे बारणे यांनी नमूद केले.
शहरातील पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. रावेत आणि निघोजे बंधाऱ्यातून उचलले जाणारे पाणी अशुद्ध असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. देहूरोड आणि किवळे परिसरातील नाल्यांचे पाणी तसेच काही सोसायट्यांचे सांडपाणी नदीपात्रात मिसळत असल्याने भविष्यात दूषित पाणीपुरवठ्याचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पर्यायी स्त्रोत म्हणून ‘शिवणे’ बंधाऱ्यातून पाणी उचलण्याबाबत तातडीने चाचपणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शहरातील १८५ किलोमीटर लांबीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनच्या अगदी जवळून किंवा खालून जात असल्याचे निदर्शनास आणून देत, ही स्थिती प्रदूषणास आमंत्रण देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. जीर्ण झालेल्या चेंबर्समुळे पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ही पाईपलाईन टप्प्याटप्प्याने बदलण्याचा आराखडा तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. “टँकर लॉबी पूर्णपणे बंद झाली पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाला पुरेसे व स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
मोकाट श्वानांच्या वाढत्या उपद्रवावर उपाय म्हणून बारणे यांनी नाविन्यपूर्ण कल्पना मांडली. मोकाट आणि पाळीव श्वानांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘GPS’ प्रणालीचा वापर करता येईल का, याचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यामुळे श्वान चावण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवणे, श्वानांचा वावर ओळखणे आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण अधिक परिणामकारकपणे राबवणे शक्य होईल. श्वानांसाठी स्वतंत्र संगोपन केंद्र उभारण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला विचार करण्यास सांगितले.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता पूर्ण करणे ही आणखी एक महत्त्वाची सूचना त्यांनी केली. वेळेवर साफसफाई न झाल्याने पावसाळ्यात पाणी साचणे, दुर्गंधी आणि आरोग्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे संबंधित विभागांनी पूर्वतयारी करून सर्व वाहिन्यांची स्वच्छता वेळेत पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले.
या आढावा बैठकीतून स्पष्ट संदेश देत बारणे यांनी सांगितले की, शहराच्या विकासाचे खरे मोजमाप मोठ्या प्रकल्पांत नसून नागरिकांना मिळणाऱ्या दैनंदिन सेवांच्या गुणवत्तेत आहे. पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने तातडीने आणि प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare