राखीमध्ये 3 गाठी का बांधतात? जाणून घ्या रक्षाबंधनातील धार्मिक महत्त्व
राखीमध्ये 3 गाठी का बांधतात? जाणून घ्या रक्षाबंधनातील धार्मिक महत्त्व
रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना तीन गाठी का बांधल्या जातात? जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक, आध्यात्मिक आणि भावनिक महत्त्व.
सायली मेमाणे
पुणे १ ऑगस्ट २०२५ : रक्षाबंधन हा सण केवळ भावंडांमधील प्रेमाचे प्रतीक नसून त्यामागे अनेक पारंपरिक श्रद्धा आणि धार्मिक संकेत दडलेले असतात. राखी बांधणे ही एक धार्मिक क्रिया असून त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीला खास महत्त्व असते. त्यापैकीच एक म्हणजे राखीमध्ये तीन गाठी बांधण्याची प्रथा. बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना त्या दोऱ्यात तीन गाठी बांधते आणि त्यामागे एक पवित्र भावना असते. हे केवळ सौंदर्यासाठी केले जात नाही तर यामागे खास आध्यात्मिक आणि भावनिक संकेत आहेत.
पहिली गाठ म्हणजे ‘संरक्षणाची’ – बहिण आपल्या भावाला प्रत्येक संकटापासून संरक्षण लाभो अशी प्रार्थना करते. या गाठीत तिच्या भावना गुंफलेल्या असतात की तिचा भाऊ सुरक्षित राहावा आणि कोणतेही वाईट प्रभाव त्याच्यापर्यंत पोहचू नयेत.
दुसरी गाठ म्हणजे ‘समृद्धीची’ – भावाच्या जीवनात आर्थिक, मानसिक आणि सामाजिक स्थैर्य नांदावं, त्याच्या यशात भर पडावी ही भावना यामागे असते. ही गाठ म्हणजे प्रगतीसाठी दिलेला शुभाशिर्वाद आहे.
तिसरी गाठ म्हणजे ‘आयुष्यभराच्या नात्याची’ – हा केवळ एक दिवसाचा उत्सव नाही तर भावंडांमधील नातं सदैव टिकावं यासाठी बहिणी ही शेवटची गाठ बांधते. ही नात्याची गाठ असून, या नात्याला कोणीही तोडू शकणार नाही, अशी तिची श्रद्धा असते.
या तिन्ही गाठी बहिणी आपल्या मनोभावे आणि भक्तिभावाने बांधते. राखी हा सण जितका स्नेहाचा आहे तितकाच श्रद्धेचा देखील आहे. या गाठी बंधनाचे प्रतीक आहेत आणि यातूनच रक्षाबंधनाची खरी भावना व्यक्त होते. त्यामुळे प्रत्येक बहिणीने राखी बांधताना या गाठींचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन त्यामध्ये मनोभाव ठेवावा, कारण हाच प्रेमाचा आणि रक्षणाचा खरा धागा आहे.