नांदेडमधील रुग्णालयात महिलांच्या अंगावर फिरले उंदीर; आरोग्य यंत्रणेवर संतापाचा भडका
नांदेडमधील रुग्णालयात महिलांच्या अंगावर फिरले उंदीर; आरोग्य यंत्रणेवर संतापाचा भडका
नांदेडच्या ग्रामीण रुग्णालयात महिला रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे संतापाची लाट उसळली आहे.
सायली मेमाणे
पुणे १ ऑगस्ट २०२५ : नांदेड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात घडलेला धक्कादायक प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. एका महिला रुग्णाच्या अंगावर थेट उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात एका वृद्ध रुग्णाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची घटना ताजी असतानाच, आता हा नवा प्रकार उघड झाला आहे.
ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुरक्षेची कोणतीही सोय नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्यसेवांच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च केला जातो, तरीही रुग्णालयांमध्ये उंदीर फिरत असल्याचे वास्तव धक्कादायक आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात एक महिला रुग्ण आपल्या बेडवर झोपलेली असताना तिच्या अंगावर थेट उंदीर चढून फिरताना दिसतो. हा व्हिडिओ एका नातेवाईकाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून, तो पाहून कोणालाही संताप अनावर होईल.
या व्हिडिओमध्ये केवळ एकच नव्हे तर अनेक उंदीर रुग्णालयात मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. विशेषतः महिला वार्डामध्ये उंदीर धावाधाव करत असल्याचे स्पष्टपणे दाखवले गेले आहे. ही परिस्थिती बघता रुग्णांचे जीव धोक्यात घालणाऱ्या आरोग्य व्यवस्था हीच रुग्णांच्या आजाराची खरी कारणीभूत बनत असल्याचे चित्र दिसते. आरोग्य यंत्रणेची ही भयावह स्थिती म्हणजेच सलाइनवर ठेवलेली यंत्रणा असल्याची जनतेमध्ये चर्चा सुरू आहे.
नांदेडमधील या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोग्य यंत्रणेला तात्काळ जबाबदार धरले जात आहे. स्थानिक प्रशासनाने याप्रकरणी चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घटनांमुळे रुग्णालयांमधील स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री या संपूर्ण प्रकरणावर काय भूमिका घेतात आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.