पुणे गणेशोत्सव २०२६: ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’ मानाच्या गणपतींचे दिमाखात आगमन

पुणे गणेशोत्सव २०२६: ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’ मानाच्या गणपतींचे दिमाखात आगमन
पुण्यात मानाच्या पाच गणपतींचे ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात आगमन झाले. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याने पुण्याच्या मध्यवर्ती भागात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला.
पुणे, १५ सप्टेंबर २०२६ : ढोल-ताशांचा गजर, सनई-चौघड्याचे मंगल सूर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने पुण्याच्या मध्यवर्ती भागात सोमवारी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. पुण्याच्या मानाच्या गणपतींसह प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींचे थाटात आगमन झाले. आगमन मिरवणुकांनंतर ठरलेल्या वेळेनुसार विविध मंडळांमध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळे पार पडले. त्यामुळे दिवसभर पुण्याच्या मध्यवर्ती भागात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली.
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती यांच्या १३४व्या वर्षाच्या उत्सवाला सकाळी ९ वाजता रास्ता पेठेतील पॉवर हाऊस चौकातून निघालेल्या आगमन मिरवणुकीने सुरुवात झाली. या मिरवणुकीत प्रभात बँड, ज्ञानप्रबोधिनी, शौर्य आणि संघर्ष पथक सहभागी झाले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तांनी श्रींचे स्वागत केले. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे गुरुजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला.
मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती यांच्या आगमन मिरवणुकीला सकाळी १० वाजता नारायण पेठेतील मंदार लॉज येथून सुरुवात झाली. नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, ताल पथक आणि विष्णूनाद शंख पथकाने मिरवणुकीत उत्साह वाढवला. दुपारी १२.१५ वाजता योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यंदाच्या उत्सवासाठी तुळजाभवानी मंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती यांच्या आगमनाची मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू झाली. विविध ढोल-ताशा पथकांच्या सहभागामुळे मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण होते. फुलांनी सजविलेल्या रथातून श्रींचे आगमन झाले. दुपारी १.५५ वाजता पुनीतशेठ आणि जान्हवी बालन यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा मंडळाने पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती यांच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. दुपारी १२.३० वाजता गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा मंडळातर्फे भव्य ब्रह्मणस्पती मंदिराची सजावट करण्यात आली असून, भाविकांसाठी श्रींच्या चरणस्पर्शाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपती यांच्या आगमन मिरवणुकीला सकाळी ९ वाजता रमणबाग चौकातून सुरुवात झाली. पालखीतून श्रींचे आगमन करण्यात आले. बिडवे बंधूंचे सनई-चौघडा तसेच श्रीराम आणि कलावंत ढोल-ताशा पथकाने मिरवणुकीत मंगलमय वातावरण निर्माण केले. सकाळी ११.३५ वाजता रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
मानाच्या पाचही गणपतींच्या आगमनामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागात भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक उत्साहाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. पारंपरिक वाद्यांचा निनाद, आकर्षक सजावट, मिरवणुकांमधील शिस्तबद्ध सहभाग आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने पुण्याच्या गणेशोत्सवाची भव्य सुरुवात झाली. पुढील दिवसांत भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने उत्सवाच्या काळात नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना आणि वाहतूक व्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare