रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती; निवडणूक प्रचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती; निवडणूक प्रचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोबोट निवडणूक प्रचार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील असल्याचा दावा; सत्य काय?
पुणे ८ जानेवारी २०२६ : सोशल मीडियावर दररोज काही ना काही वेगळे, मजेशीर किंवा आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी प्राणी, कधी तंत्रज्ञान, तर कधी माणसांच्या अनोख्या कृतींमुळे हे व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतात. सध्या असाच एक अनोखा आणि लक्षवेधी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये थेट एक रोबोट राजकीय पक्षाचा झेंडा हातात घेऊन निवडणूक प्रचार करताना दिसत आहे.
महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला असून सभा, पदयात्रा, बॅनर, पोस्टर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर हा व्हायरल व्हिडिओ अधिक चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मानवी आकाराचा रोबोट रस्त्यावर उभा असून, त्याच्या हातात राजकीय पक्षाचा झेंडा दिसत आहे. विशेष म्हणजे तो प्रचार करत असल्याचा भास निर्माण होतो आहे.
हा व्हिडिओ नेमका कुठल्या ठिकाणचा आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावरील कमेंट सेक्शनमध्ये अनेक युजर्स हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा दावा करत आहेत. काहींनी हा व्हिडिओ महाराष्ट्रातीलच असल्याचे म्हटले असून, तर काहींनी यामागे केवळ मनोरंजनाचा उद्देश असल्याचे मत व्यक्त केले आहे. व्हिडिओला पार्श्वसंगीत म्हणून ‘आमचं पुणे’ हे गाणे लावण्यात आल्याने तो आणखी चर्चेचा विषय ठरला आहे.
या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जण याला तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला नावीन्यपूर्ण प्रचार म्हणत आहेत, तर काही जण हा निव्वळ मजेशीर आणि स्टेज केलेला प्रकार असल्याचे सांगत आहेत. काही युजर्सनी यावर उपरोधिक कमेंट्स करत “आता रोबोटही राजकारणात उतरले” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तंत्रज्ञानाचा वापर राजकारणात दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अॅनालिटिक्स यांचा वापर निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा परिस्थितीत रोबोट प्रचार करतानाचा हा व्हिडिओ खरा की केवळ व्हायरल कंटेंटसाठी तयार केलेला, याबाबत शंका उपस्थित होत आहेत. मात्र, हा व्हिडिओ पाहून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते, ती म्हणजे निवडणूक प्रचाराच्या पद्धतीही आता बदलत असून, लोकांचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.
हा व्हिडिओ खरा प्रचार आहे की केवळ मनोरंजनासाठी केलेला प्रयोग, याचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. तरीही सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, निवडणूक प्रचार आणि तंत्रज्ञान यांचा अनोखा संगम म्हणून तो चर्चेचा विषय ठरत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information