लोणावळा अत्याचार प्रकरण: डॉ. नीलम गोऱ्हे यांची तातडीची दखल पीडितेच्या शिक्षण, सुरक्षेसाठी प्रशासनाला कडक सूचना

लोणावळा अत्याचार प्रकरण: डॉ. नीलम गोऱ्हे यांची तातडीची दखल पीडितेच्या शिक्षण, सुरक्षेसाठी प्रशासनाला कडक सूचना
मावळ तालुक्यातील जवन (पवना धरण) येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लोणावळ्यात बैठक घेऊन पीडितेच्या शिक्षण, समुपदेशन, सुरक्षा आणि शासकीय योजनांच्या लाभाबाबत प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले.
पुणे ११ मे २०२६ : मावळ तालुक्यातील जवन (पवना धरण परिसर) येथे ऑगस्ट २०२४ मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी ५ मे रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर या संवेदनशील घटनेची गांभीर्याने दखल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. लोणावळा येथे वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी पीडित मुलीला तातडीची मदत, सुरक्षा आणि न्याय मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, पीडित मुलीचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक ती मदत दिली जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने समन्वय साधून शैक्षणिक, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत त्वरेने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले. पीडित मुलीच्या भवितव्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन या तीन घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यावर त्यांनी भर दिला.
पोक्सो प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पीडितेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. महिला दक्षता समितीसोबत अनौपचारिक महिला कोअर टीम स्थापन करण्याची सूचना देण्यात आली, ज्यामध्ये महिला लोकप्रतिनिधींचा समावेश असेल. या टीमच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची माहिती तातडीने प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगाने राबवता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तालुक्यातील सुमारे २५ हजार ‘लाडक्या बहिणींना’ या उपक्रमात सहभागी करून सामुदायिक सतर्कता वाढवण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला.
पीडित मुलीच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने भरोसा सेल आणि वन स्टॉप क्रायसिस सेंटरमार्फत समुपदेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली. समुपदेशन MSW पदवीधर महिलांकडून करण्याच्या सूचना देत, दीर्घकालीन पुनर्वसनासाठी सातत्यपूर्ण मानसोपचार आणि सामाजिक आधार महत्त्वाचा असल्याचे नमूद करण्यात आले. बालसंगोपन योजनेचा लाभ देऊन पीडितेला आर्थिक आणि सामाजिक संरक्षण मिळावे, यावरही भर देण्यात आला.
यावेळी विसापूर येथील घटना आणि रस्त्यातून मुलीला उचलून नेण्याच्या प्रकरणाचाही आढावा घेण्यात आला. या दोन्ही प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल झाले असून न्यायालयीन प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक यंत्रणा मजबूत करावी, असे निर्देश देण्यात आले.
बैठकीस महसूल, पोलीस, महिला व बालविकास विभागातील अधिकारी उपस्थित होते. पीडितेला न्याय मिळवून देताना तिची ओळख गोपनीय ठेवणे, कुटुंबाला कायदेशीर मार्गदर्शन देणे आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणे, या बाबींवर एकमत झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस आणि सामाजिक यंत्रणा यांचा समन्वय अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित झाली.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare