विजय देवरकोंडाची ED चौकशी: अवैध सट्टेबाजी प्रकरणात साऊथ सुपरस्टार अडचणीत
विजय देवरकोंडाची ED चौकशी: अवैध सट्टेबाजी प्रकरणात साऊथ सुपरस्टार अडचणीत
साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा ईडी चौकशीत हजर; अवैध ऑनलाइन सट्टेबाजी आणि मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशी सुरू. राणा दग्गुबती, प्रकाश राज आणि लक्ष्मी मांचू यांनाही समन्स.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑगस्ट २०२५ : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या अवैध ऑनलाइन सट्टेबाजी आणि मनी लाँडरिंग प्रकरणात अडचणीत सापडला आहे. बुधवारी ते हैदराबादमधील सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) क्षेत्रीय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. याआधी 30 जुलै रोजी याच प्रकरणात अभिनेते प्रकाश राज यांचीही चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अभिनेता राणा दग्गुबती, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मांचू यांनाही समन्स बजावण्यात आले आहेत. या कलाकारांनी जाहिरातीच्या स्वरूपात काही ऑनलाईन सट्टेबाजी अॅप्सचे प्रमोशन केले होते, ज्यामुळे लाखो-कोट्यवधी रुपयांचा अवैध आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे.
पाच राज्यांतील पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. यामध्ये असे सांगण्यात येते की, काही सेलिब्रिटींनी अॅप्सच्या प्रमोशनसाठी मोठ्या रक्कमेची फी स्वीकारली होती. मात्र, या अॅप्सचा मुख्य उद्देश अवैध जुगार आणि सट्टेबाजी असल्याचे पुढे आले आहे. ईडीकडून या सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत असून, प्रकरण मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) तपासले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही कलाकारांनी चौकशीदरम्यान सांगितले की, त्यांना अॅप्सच्या वास्तविक उद्देशाची माहिती नव्हती आणि आपला कोणत्याही गैरकृत्यात थेट सहभाग नव्हता. मात्र, ईडी या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेऊन संपूर्ण नेटवर्क उघडकीस आणण्याच्या प्रयत्नात आहे. विजय देवरकोंडा यांचा जबाब नोंदवून घेतला गेला असून, या चौकशीचा पुढील टप्पा लवकरच जाहीर केला जाईल.