विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभर अलर्ट! अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाईचे उत्पादन शुल्क आयुक्तांचे आदेश

विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभर अलर्ट! अवैध दारूविक्रीवर कठोर कारवाईचे उत्पादन शुल्क आयुक्तांचे आदेश
पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणात 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी राज्यभरातील अवैध दारू विक्री, निर्मिती आणि तस्करीविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
पुणे ०१ जून २०२६ :पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे विषारी दारू प्राशनामुळे 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. या गंभीर घटनेनंतर राज्यभरातील अवैध दारू विक्री, निर्मिती आणि तस्करीविरोधात व्यापक कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व उत्पादन शुल्क अधीक्षकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे निर्देश दिले.
डॉ. देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्या भागात अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळेल, त्या ठिकाणी तात्काळ छापेमारी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यभर विशेष तपास मोहीम राबवून अवैध दारू अड्ड्यांवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विषारी दारू प्रकरणानंतर राज्य सरकार आणि उत्पादन शुल्क विभागावर मोठ्या प्रमाणात टीका होत असल्याने प्रशासनाने आता कारवाईचा वेग वाढवला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला असून अनेक रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवला आहे. तपासासाठी पाच विशेष पथके स्थापन करण्यात आली असून ती विषारी दारूच्या निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या संपूर्ण साखळीचा शोध घेणार आहेत.
दरम्यान, हडपसर परिसरात शिवसेनेने केलेल्या कारवाईनंतर शहरातील अवैध दारू व्यवसायाचा मोठा मुद्दा समोर आला आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री आणि बनावट दारू निर्मिती केंद्रांची माहिती प्रशासनाला दिली जात आहे. शिवसेनेच्या माहितीनुसार पुणे शहरात तब्बल 42 अवैध दारू अड्डे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी या संदर्भात गंभीर आरोप करत, हडपसरमधील नऊ अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त झाल्यानंतर नागरिक स्वतः माहिती देत आहेत, मात्र संबंधित यंत्रणांना हे अड्डे कसे दिसले नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे.
या प्रकरणावर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, अशा घटना घडल्यानंतर केवळ चर्चा न होता त्यामागील संपूर्ण पुरवठा साखळी उघड करणे आवश्यक आहे. विषारी दारूमध्ये वापरले गेलेले मिथेनॉलसारखे घातक रसायन नेमके कुठून आले, त्याची विक्री कोणी केली आणि ते अवैध दारू उत्पादकांपर्यंत कसे पोहोचले याचा सखोल तपास व्हायला हवा.
तसेच रासायनिक तपासणी अहवाल तातडीने जाहीर करून या प्रकरणात सक्षम सरकारी वकिलाची नियुक्ती करावी आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. राज्यभर सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसायावर कितपत आळा बसतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare