सातारा नगराध्यक्ष निवडणूक : अभिजित बिचुकलेची एंट्री, मोठी आश्वासने आणि थेट आव्हान!

0
सातारा नगराध्यक्ष निवडणूक : अभिजित बिचुकलेची एंट्री, मोठी आश्वासने आणि थेट आव्हान!

सातारा नगराध्यक्ष निवडणूक : अभिजित बिचुकलेची एंट्री, मोठी आश्वासने आणि थेट आव्हान!

अभिजित बिचुकले सातारा नगराध्यक्षपदासाठी रिंगणात; मोठी आश्वासने, भावनिक आवाहन आणि दोन्ही राजेंना थेट आव्हान. साताऱ्यात निवडणुकीची रंगत वाढली

सायली मेमाणे

पुणे १७ नोव्हेंबर २०२५ : सातारा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अचानक मोठी राजकीय हलचल निर्माण झाली आहे. नेहमीच चर्चेत राहणारे आणि स्वतःची वेगळी राजकीय ओळख जपणारे अभिजित बिचुकले यांनी थेट सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकसभा, विधानसभा आणि अगदी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेल्या बिचुकले यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत निवडून नवीन समीकरणे निर्माण केली आहेत.

अभिजित बिचुकले यांनी कोणतेही शक्तीप्रदर्शन, शो-ऑफ न करता साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी भावनिक पद्धतीने आपल्या उमेदवारीची कारणे आणि साताऱ्याशी असलेलं नातं व्यक्त केलं. सातारा नगरपालिका ही आपली ‘मातृसंस्था’ असल्याचे ते म्हणाले. येथे नोकरी करताना काही व्यक्तींनी कट रचून आपल्याला कामावरून काढून टाकल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला. “या नगरपालिकेची सर्व अंडीपिल्ली मला माहित आहेत. मी नगराध्यक्ष झाल्यावर सर्व उघड करणार,” असा इशाराही त्यांनी दिला.

साताऱ्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, बागांची पडझड आणि नगरविकासातील ढिसाळपणा असल्याचे त्यांनी सांगितले. “एक संधी द्या, साताऱ्याला ‘सितारा’ बनवून दाखवतो. साताऱ्याचा खरा सितारा मीच आहे,” असा दावा त्यांनी केला. केवळ विकासाचे आश्वासनच नव्हे, तर साताऱ्यात बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचेही आश्वासन त्यांनी जाहीर केले.

वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या प्रेमाची आठवण काढत त्यांनी साताऱ्यातील नागरिकांना पुन्हा साथ देण्याचे आवाहन केले. “लोकसभा असो की विधानसभा, मला लोकांनी प्रचंड प्रेम दिलं. आता नगराध्यक्षपदासाठी त्याच प्रेमाची गरज आहे,” असे ते म्हणाले. साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष आणि सर्वमान्य नेते अरुण काका गोडबोले यांचा संदर्भ देत त्यांनी भावनिक विधान केले—“साताऱ्याचे आदर्श अरुण काका होते, पण त्यांच्यासाठी काही झाले नाही. ते शहराचे वैभव होते. आता ते वैभव मी परत आणणार.”

साताऱ्यातील राजकारणात बिचुकले यांची एंट्री म्हणजे दोन्ही राजेंना—उदयराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले—थेट आव्हानच असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. बिचुकले यांनीही हे आव्हान उघडपणे मान्य केले असून, नगराध्यक्षपदाची निवडणूक ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. त्यांनी साताऱ्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा शब्द दिला असून, “सातारा माझ्या हातात द्या; मी साताऱ्याचं भविष्य बदलून दाखवतो,” असा आत्मविश्वासही व्यक्त केला.

साताऱ्यात बिचुकले यांची एंट्रीमुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी रंगत आली आहे. पारंपारिक राजकीय घराण्यांना वैकल्पिक पर्याय देणारा चेहरा म्हणून बिचुकले समोर आले आहेत. त्यांची निर्भीड भाषा, वेगळी ओळख आणि सतत चर्चेत राहण्याची शैली ही या निवडणुकीला अधिकच नाट्यमय आणि उत्सुकतेची बनवते. पुढील काही दिवसांत इतर पक्ष उमेदवार जाहीर करतील आणि त्यानंतर ही निवडणूक अधिक तापण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed