अमरावतीत महावितरण भरतीत महाघोटाळ्याचा आरोप; बेरोजगार तरुणांनी उर्जामंत्री मेघना बोर्डीकरांकडे मांडल्या व्यथा
अमरावतीत महावितरण भरतीत महाघोटाळ्याचा आरोप; बेरोजगार तरुणांनी उर्जामंत्री मेघना बोर्डीकरांकडे मांडल्या व्यथा
एमएसईबी भरती प्रक्रियेत अनियमितता आणि वेटिंग लिस्ट अडकल्या असल्याने लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांनी उर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांना निवेदन दिले. दरवर्षी नियमित भरती व वयोमर्यादा वाढवण्याची मागणी.
सायली मेमाणे
पुणे २९ नोव्हेंबर २०२५ : अमरावती जिल्ह्यात महावितरण आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विविध भरती प्रक्रियांमध्ये झालेल्या अनियमितता, विलंब आणि संशयित घोटाळ्यांविरोधात विद्यार्थ्यांचा रोष उफाळून आला आहे. शिकूनही रोजगार न मिळणाऱ्या लाखो उमेदवारांच्या वतीने उर्जामंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे महावितरण (MSEB) भरती घोटाळ्यासह विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 2019 पासून उपकेंद्र सहायक आणि विद्युतसहाय्यक यांसारख्या पदांसाठी भरती प्रक्रिया न राबवल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
अमरावतीतील ‘केंद्रे इन्स्टिट्युट’चे संचालक सहदेव केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीमंडळाने मेघना बोर्डीकर यांची भेट घेतली. या प्रातिनिधिक बैठकीत विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियांच्या तक्रारी आणि शंका प्रत्यक्ष मांडण्यात आल्या. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे अभ्यास करूनही सरकारी भरती निघत नसल्याने भविष्यासंबंधी संभ्रम आणि मानसिक तणाव वाढल्याचे सांगितले. महावितरणच्या भरती परीक्षा घेतल्या गेल्या असल्या तरी निवड यादी आणि वेटिंग लिस्ट वेळेवर जाहीर न होणे, निकालात पारदर्शकता नसणे, तसेच काही पदांसाठी GATE सक्तीमुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मागण्यांमध्ये 50 टक्के वेटिंग लिस्ट क्लिअर करून विद्युतसहाय्यकाची तिसरी निवड यादी त्वरित जाहीर करण्याची मागणी महत्त्वाची आहे. तसेच सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्या वेटिंग लिस्ट वेळेत क्लिअर करण्याची मागणी नोंदवली गेली. महापारेषणसह MSEB च्या तिन्ही विभागात ITI, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या रिक्त पदांची वार्षिक भरती प्रक्रिया अनिवार्य करण्याची गरज उमेदवारांनी अधोरेखित केली.
विद्यार्थ्यांनी MSEB मधील 3 वर्षांच्या कंत्राटी पद्धतीला 1 वर्षावर आणण्याची मागणी केली, तसेच कंत्राटी वेतन अत्यंत कमी असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या गृह जिल्ह्यात नियुक्ती देण्याची सूचना केली. UPSC, MPSC आणि SSC प्रमाणे दरवर्षी भरतीचे कॅलेंडर जाहीर करून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याची मागणीही महत्त्वाची होती. दिव्यांग आणि EWS उमेदवारांच्या जॉइनिंगला वेग देण्याचीही विनंती करण्यात आली.
अनेक विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा भरती प्रक्रिया न झाल्यामुळे संपल्या किंवा संपत आल्याने वयोमर्यादा वाढवण्याची मागणीही जोरदारपणे मांडण्यात आली. तसेच ‘अकाउंट LDC’चा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा आणि Jr. Accountant ची वेटिंग लिस्ट तत्काळ प्रदर्शित करावी, अशीही मागणी पंचक्रोशीतील बेरोजगार उमेदवारांनी केली. सर्व भरती निकाल पारदर्शक ठेवण्यासाठी प्रत्येक विषयातील तपशीलवार गुण (Marks) उमेदवारांना दाखवावेत, जेणेकरून शंकांना पूर्णविराम मिळेल, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
त्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून, या सर्व तक्रारी आणि मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. महावितरणमधील अनियमितता आणि प्रलंबित पदांबाबत शासनस्तरावर सखोल बैठक घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनीही अपेक्षा व्यक्त केली की, शासनाने तातडीने निर्णय घेऊन भरती प्रक्रिया मार्गी लावावी.
ही संपूर्ण घडामोड राज्यातील उर्जा विभागावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते. लाखो विद्यार्थ्यांचे करियर आणि भविष्यातील संधी या भरती प्रक्रियेवर अवलंबून असल्याने, शासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information