अमेरिकेचं अत्याधुनिक F-35 लढाऊ विमान कॅलिफोर्नियात कोसळलं; भारतात केरळमध्ये उतरले होते
अमेरिकेचं अत्याधुनिक F-35 लढाऊ विमान कॅलिफोर्नियात कोसळलं
अमेरिकेचं पाचव्या पिढीतील F-35 लढाऊ विमान कॅलिफोर्नियामध्ये कोसळलं आहे. याआधी हे विमान भारतात केरळमध्ये उतरलं होतं. पायलट सुरक्षित, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका.
सायली मेमाणे
पुणे ३१ जुलै २०२५ : अमेरिकेच्या अत्याधुनिक आणि अभिमानास्पद मानल्या जाणाऱ्या F-35 लढाऊ विमानाने पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू गाठला आहे. यावेळी या पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमानाने कॅलिफोर्नियामध्ये धक्कादायकरित्या अपघात झाल्याचं समोर आलं आहे. अपघातात पायलट सुखरूप बाहेर आला असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सैनिकी प्रतिष्ठेवर हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रसंग मानला जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी या विमानाने भारतातील केरळमध्ये आपत्कालीन लँडिंग केलं होतं. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान केरळमध्ये उतरलं होतं आणि त्यानंतर अमेरिकन लष्कराने त्याची तपासणी करून पुन्हा उड्डाणासाठी योग्य ठरवलं. मात्र केवळ काही दिवसांतच हेच विमान अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात कोसळल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. यामुळे या महागड्या आणि प्रगत तंत्रज्ञान असलेल्या लढाऊ विमानाच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
अमेरिकेने अब्जावधी डॉलर खर्च करून विकसित केलेल्या या F-35 विमानांची ही अपयशाची मालिका सुरूच आहे. जगातील सर्वात घातक आणि अद्ययावत लढाऊ विमान म्हणून याचा प्रचार करण्यात आला होता. F-35 विमानं ‘स्टेल्थ टेक्नॉलॉजी’ने सज्ज आहेत आणि शत्रूच्या रडारवर न दिसण्याची त्यांची क्षमता हीच त्यांची खासियत मानली जाते. मात्र गेल्या वर्षभरात या विमानांशी संबंधित अनेक तांत्रिक बिघाड, आपत्कालीन लँडिंग, आणि क्रॅश यांसारख्या घटना समोर आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतातही चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं राफेल विमानावरून भारतावर सातत्याने टीका करणं प्रसिद्ध आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर राफेल विमान कोसळल्याच्या बाता करत भारताच्या लष्करी क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले होते. परंतु आता स्वतः त्यांच्या देशातच एवढ्या महागड्या लढाऊ विमानाचा अपघात झाल्याने अमेरिका आणि ट्रम्प यांची मोठी नाचक्की झाल्याची चर्चा जगभर सुरू आहे.
या घटनेमुळे अमेरिकेच्या संरक्षण विभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एका बाजूला या विमानांची विक्री जगभरात करण्याचा प्रयत्न सुरु आहे, तर दुसरीकडे त्याची तांत्रिक शाश्वतता, सुरक्षा आणि यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्न उभा राहत आहे. भारतासह अनेक देशांनी या घटनेचा अभ्यास करावा लागणार आहे, जेणेकरून भविष्यातील संरक्षण खरेदीचे धोरण अधिक विचारपूर्वक ठरवता येईल.