अरबी समुद्रात उकळ्यांचे रिंगण; गुजरात किनाऱ्याजवळ विचित्र प्रवाहामुळे मच्छीमारांमध्ये भीती
अरबी समुद्रात उकळ्यांचे रिंगण; गुजरात किनाऱ्याजवळ विचित्र प्रवाहामुळे मच्छीमारांमध्ये भीती
अरबी समुद्रात गुजरात किनाऱ्याजवळ उकळ्यांसारख्या पाण्याचे गोलाकार रिंगण निर्माण झाल्याने मच्छीमारांमध्ये भीती पसरली आहे. वसईतील मच्छीमार बोट या रहस्यमय प्रवाहाच्या संपर्कात आली असून प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.
पुणे २० जानेवारी २०२५: अरबी समुद्रात गुजरात किनाऱ्याजवळ समुद्राच्या पाण्यात झालेल्या विचित्र हालचालींमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. समुद्राचे पाणी जोरात फिरत असल्याचे, मोठ्या प्रमाणावर बुडबुडे येत असल्याचे आणि जणू काही पाणी उकळत असल्यासारखे दृश्य दिसत असल्याने मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनही सतर्क झाले असून नेमके कारण काय, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वसईतील पाचूबंदर येथील मच्छीमार कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची ‘ओम नमः शिवाय’ नावाची मच्छीमार बोट 11 जानेवारी रोजी मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेलेली होती. किनाऱ्यापासून सुमारे 66 नॉटिकल मैल अंतरावर असताना ही बोट अचानक एका रहस्यमय समुद्री प्रवाहाच्या संपर्कात आली. त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्याने मोठ्या आकाराचे गोलाकार रिंगण तयार केले होते. पाणी मातकट रंगाचे दिसत होते आणि वेगाने फिरत होते. काही काळ बोट त्या प्रवाहात अडकली होती, त्यामुळे मच्छीमारांमध्ये घबराट निर्माण झाली.
मात्र, प्रसंगावधान राखत मच्छीमारांनी इंजिनचा वेग वाढवला आणि बोट सुरक्षितपणे त्या प्रवाहातून बाहेर काढली. त्या वेळी त्यांनी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये समुद्राचे पाणी उकळ्यांसारखे उसळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक मच्छीमारांमध्ये भीती पसरली असून, अशा प्रवाहांमुळे जीवित आणि नौकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी ही घटना अत्यंत असामान्य असल्याचे सांगत सखोल चौकशीची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, समुद्रतळावरील वायूगळती, पाण्याखालील भूगर्भीय हालचाल किंवा समुद्राखालील पाइपलाइनमधील गळतीमुळे अशा प्रकारचा प्रवाह निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सागरी प्राधिकरणांशी समन्वय साधण्यात आला असून, त्या परिसरात जाणाऱ्या जहाजे आणि मासेमारी नौकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी सांगितले की, या घटनेची माहिती तात्काळ नौदल, तटरक्षक दल आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी (NIO) यांना देण्यात आली आहे. ही घटना भूकंपाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले असून, ओएनजीसीच्या गॅसलाईनमुळे असा प्रवाह निर्माण झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
CSIR–NIOच्या प्रभारी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोनिया सुकुमारन यांनी या घटनेचा भूभौतिकीय अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. समुद्राखालील पाइपलाइन किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे हा प्रकार घडला आहे का, याची खात्री करण्यासाठी सखोल तपास आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या घटनेबाबत स्पष्ट माहिती नागरिकांना देणे गरजेचे असून, त्यामुळे मच्छीमारांमधील भीती दूर होईल आणि भविष्यातील संभाव्य अपघात टाळता येतील.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information