‘अलविदा दादा…’ अखेर घड्याळाचा काटा थांबला; अजित पवार अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
‘अलविदा दादा…’ अखेर घड्याळाचा काटा थांबला; अजित पवार अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीतील विमान अपघातात निधन झाले. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात लाखोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
पुणे २८ जानेवारी २०२६ : अखेर तो क्षण आला, ज्याची कुणालाच तयारी नव्हती. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ताकदवान, प्रभावी आणि कायम चर्चेत असलेलं नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं. ‘अलविदा दादा…’ या शब्दांत अश्रूंनी ओलावलेली बारामती आज आपल्या लाडक्या नेत्याला अंतिम निरोप देताना दिसली. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले होते. गुरुवारी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारावेळी बारामतीमध्ये अक्षरशः लाखोंचा जनसमुदाय उसळला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू, मनात हळहळ आणि ओठांवर एकच वाक्य – ‘दादा परत या’. लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय इतमामात अजित पवार यांना तोफांची सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत आणि शोकसंदेशांच्या वातावरणात अखेर घड्याळाचा काटा थांबल्याची जाणीव प्रत्येकाला झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान लँडिंगच्या प्रयत्नात असताना अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पायलट कॅप्टन सुमित कपूर, सह-पायलट शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर केला आहे. अपघाताच्या चौकशीसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणारे एएआयबी तपास करत असून, पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल दाखल केला आहे.
अजित पवार यांनी राजकारणाचे धडे काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले, मात्र कालांतराने त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. गेल्या १६ वर्षांत महाराष्ट्रात सत्ता कुणाचीही असो, अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदावर कायम प्रभावी भूमिका बजावताना दिसले. त्यांच्या ४५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी एकदा खासदार, आठ वेळा आमदार आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. राज्यात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री म्हणूनही त्यांची नोंद घेतली जाते.
२२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे जन्मलेले अजित पवार लहानपणापासूनच राजकीय वातावरणात वाढले. १९८२ मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून येत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले आणि त्याच वर्षी बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले. नंतर त्यांनी ही जागा काका शरद पवार यांच्यासाठी सोडली आणि स्वतः राज्याच्या राजकारणात लक्ष केंद्रीत केलं.
१९९३ पासून अजित पवार यांनी सलग आठ वेळा विधानसभा निवडणूक जिंकत पराभव न पाहणारा नेता म्हणून ओळख निर्माण केली. काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली मजबूत पकड ठेवली. आज त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नाही, तर एक युग संपल्याची भावना संपूर्ण राज्यात व्यक्त होत आहे. महाराष्ट्र आज आपल्या लाडक्या दादाला अश्रूंनी, आठवणींनी आणि अपार प्रेमाने निरोप देत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information