आंबेगाव निवडणूक 2025 : महायुती फिस्कटली? शिवसेना-भाजप वेगळे, राष्ट्रवादी अजित गट स्वतंत्र रिंगणात

0
आंबेगाव निवडणूक 2025 : महायुती फिस्कटली? शिवसेना-भाजप वेगळे, राष्ट्रवादी अजित गट स्वतंत्र रिंगणात

आंबेगाव निवडणूक 2025 : महायुती फिस्कटली? शिवसेना-भाजप वेगळे, राष्ट्रवादी अजित गट स्वतंत्र रिंगणात

आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीत फूट पडली आहे. शिवसेना शिंदे गट महाविकास आघाडीसोबत जाणार असून भाजप स्वतंत्रपणे लढणार, तर राष्ट्रवादी अजित पवार गटही एकटा मैदानात उतरणार आहे.

सायली मेमाणे

१३ नोव्हेंबर २०२५ : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत. महायुती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युतीत या वेळी मोठी फट पडली आहे. तालुक्यात महायुती फिस्कटल्याचे चित्र स्पष्ट असून सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. या तिढ्यामुळे तालुक्यातील निवडणूक पूर्वीपेक्षा अधिक कठीण आणि चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट वेगळे झाले आहेत. या निर्णयामुळे आंबेगाव तालुक्यातील पारंपरिक महायुतीचा पाया डळमळीत झाला आहे. दुसरीकडे, भाजपने स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचे ठोस संकेत दिले आहेत. हा निर्णय तालुक्यातील राजकीय वातावरण तापवणारा ठरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरतो आहे. मात्र या गटात कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षित उत्साह नसल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये एकजूट नसल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि कठीण ठरणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत महायुती असूनही दिलीप वळसे पाटील फक्त सुमारे 1500 मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी दोन उमेदवारांचे नाव सारखे असल्यामुळे महत्त्वाची मते फुटली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांना पराभव पत्करावा लागला होता.

अजित पवार गटाला येणारी निवडणूक अधिक कठीण बनवणारी बाब म्हणजे कार्यकर्त्यांकडून झालेली चुकीची माहिती. गावातील खरी राजकीय स्थिती वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवली गेली नाही. सर्व काही ठीक असल्याचा चुकीचा समज दिला गेला आणि त्याचा फटका थेट निवडणूक निकालात बसला. या वेळीही कार्यकर्त्यांमध्ये एकजूट नसल्याचे स्पष्ट होत असून निवडणुकीपूर्वी पक्षाची अंतर्गत स्थिती चिंतेत टाकणारी आहे.

तालुक्यातील काँग्रेस पक्ष जवळजवळ अस्तंगत झाल्याने लढत मुख्यतः तीन पक्षांत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे वळसे पाटलांसोबत काम करत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा समूह राष्ट्रवादीत दाखल न झाल्याने निवडणुकीवर त्यांचा प्रभाव किती राहील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरणार असून ते कोणत्या पद्धतीने मतांचा प्रवाह बदलतात हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

आगामी निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे उतरण्याची स्पष्टता आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. प्रत्येक प्रभागात मतदारसंघाचे गणित बदलत असून तालुक्यातील पारंपरिक समीकरणे पूर्णतः कोसळल्याचे दिसत आहे. महायुतीचा गड असलेला आंबेगाव तालुका आता प्रबळ त्रिकोणी लढतीकडे वाटचाल करत आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या वेळी अधिक गुंतागुंतीच्या, अधिक कसोटीदायक आणि अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी ही निवडणूक अक्षरशः अग्नीपरीक्षा ठरेल, तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटासाठी आपला स्वतंत्र प्रभाव सिद्ध करण्याची ही मोठी संधी ठरणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *