आस्था पूनिया : भारतीय नौसेनेची पहिली महिला फायटर पायलट बनून इतिहास रचला
सब लेफ्टनंट आस्था पूनिया या भारतीय नौसेनेतील पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या.
सब लेफ्टनंट आस्था पूनिया या भारतीय नौसेनेतील पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या. INS डेगा येथे त्यांना ‘विंग्स ऑफ गोल्ड’ बहाल.
सायली मेमाणे
५ जुलै २०२५ : भारतीय नौसेनेच्या इतिहासात एक नव्या युगाची सुरुवात झाली आहे. सब लेफ्टनंट आस्था पूनिया यांनी भारतीय नौसेनेच्या पहिल्या महिला फायटर पायलट म्हणून इतिहास रचला आहे. त्यांनी ‘फायटर स्ट्रीम’मध्ये प्रवेश करून महिला अधिकार्यांसाठी एक नवा मार्ग खुला केला आहे, जो आजवर बंद होता.
विशाखापट्टणमच्या INS डेगा येथे नुकत्याच पार पडलेल्या विशेष समारंभात आस्था पूनियांना ‘विंग्स ऑफ गोल्ड’ हा प्रतिष्ठेचा मान बहाल करण्यात आला. या सोहळ्यात त्यांच्यासोबत लेफ्टनंट अतुल कुमार ढुल यांनाही गौरविण्यात आले. या दोघांनीही ‘सेकंड बेसिक हॉक कन्वर्जन कोर्स’ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. भारतीय नौसेनेचे असिस्टंट चीफ ऑफ नेव्हल स्टाफ (एअर) रिअर अॅडमिरल जनक बेवली यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
भारतीय नौसेनेत महिलांना आधीपासूनच पायलट बनण्याची संधी होती, परंतु लढाऊ विमानांमध्ये म्हणजेच ‘फायटर स्ट्रीम’मध्ये त्यांना संधी नव्हती. आस्था पूनिया यांनी हे बंधन तोडत महिला अधिकाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या यशामुळे नौसेनेत महिला सहभागाला नवसंजीवनी मिळाली आहे.
दरम्यान, देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय झाला. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत कठोर प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी संरक्षण अधिग्रहण परिषदेची (DAC) महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत सुमारे ₹1.05 लाख कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामध्ये नौसेनेसाठी नवीन युद्धनौका, क्विक रिऍक्शन सर्फेस-टू-एअर मिसाईल (QRSAM), इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम, मायन्स, सुपर रॅपिड गन माउंट्स यांचा समावेश आहे.
या निर्णयांमुळे लष्कर, वायुदल आणि नौसेनेच्या एकत्रित युद्धक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. DAC च्या बैठकीत ट्राय-सर्व्हिसेससाठी इंटीग्रेटेड कॉमन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम, मायन काउंटरमेजर व्हेसल्स, सबमर्सिबल ऑटोनोमस व्हेसल्स आणि आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल्स यांना देखील मान्यता देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर आस्था पूनिया यांचे ऐतिहासिक यश केवळ व्यक्तिगत यश नाही, तर हे भारतीय संरक्षण क्षेत्रातील महिलांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या पुढाकारामुळे नौसेनेत महिलांसाठी पुढील पिढीसाठी लढाऊ पथावर वाट खुली झाली आहे.