एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीत, शहांची भेट; श्रीकांत शिंदेंना खरंच IT ची नोटीस? अखेर सत्य समोर

0
एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीत, शहांची भेट

एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीत, शहांची भेट

श्रीकांत शिंदेंना IT नोटीस आल्याच्या चर्चांवर वाद, सरकारच्या सूत्रांनी स्पष्टीकरण दिलं, एकनाथ शिंदेंनी अमित शहांची घेतली भेट.

सायली मेमाणे

पुणे ११ जुलै २०२५ : मुंबई – महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची (IT) नोटीस आल्याच्या अफवा कालपासून पसरल्या. याला उधाण दिलं खुद्द शिंदे गटाचे मंत्री आणि खासदार संजय शिरसाट यांनी, जेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदेंना नोटीस आल्याचं सांगितलं. मात्र नंतर त्यांनी आपल्या विधानावरून घूमजाव केलं आणि सांगितलं की, ते केवळ ‘एक उदाहरण’ म्हणून बोलले होते. यामुळे राज्यात नवा राजकीय पेच निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर आता सरकारमधील महत्त्वाच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे की, खासदार श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाकडून कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही. सूत्रांच्या मते, प्राप्तिकर विभाग नोटिसा पाठवताना CAS (Computer Assisted Scrutiny Selection) प्रणालीचा वापर करतो, जी पूर्णपणे संगणकाधारित असून मानवी हस्तक्षेप त्यात नसतो. अर्जांची तपासणी पूर्वनिर्धारित जोखीम मापदंडांवर आधारित असते आणि तद्नुसारच नोटिसा पाठवल्या जातात.

दरम्यान, संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना कबुल केलं की, त्यांना २०१९ ते २०२४ या कालावधीत संपत्तीतील वाढीबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. मात्र श्रीकांत शिंदेंबाबत त्यांनी स्वतःचं विधान मागे घेतलं. त्यांच्या या यू-टर्नमुळे राजकीय वर्तुळात संभ्रम आणि चर्चांना नवा आयाम मिळाला. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री अचानक दिल्लीत गेले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली.

या भेटीमागे केवळ प्राप्तिकर विभागाच्या कारवाया नाहीत, तर त्यात अन्यही अनेक राजकीय घडामोडींचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन निर्माण झालेला वाद, शिवसेनेच्या भूमिकेवर होणारी टीका, आणि ठाकरे बंधू – उद्धव आणि राज यांच्या संभाव्य राजकीय जवळीकीने शिंदे गट अडचणीत सापडल्याची चर्चा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे-शहा भेटीला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे.

श्रीकांत शिंदेंना नोटीस आलीच नाही हे स्पष्ट झाल्यानं या मुद्द्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरु झाला आहे. मात्र शिरसाट यांच्या वक्तव्याने जे वातावरण तयार झालं, त्याचा परिणाम आगामी राजकीय घडामोडींवर निश्चितच होऊ शकतो. एकनाथ शिंदे दिल्लीहून परतले असले, तरी राजकीय चर्चेला सध्या पूर्णविराम लागलेला नाही.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed