एका दिवशी ५ अपघातांनी महाराष्ट्र हादरला; तीन ठार, वीस जखमी

0
एका दिवशी ५ अपघातांनी महाराष्ट्र हादरला; तीन ठार, वीस जखमी

एका दिवशी ५ अपघातांनी महाराष्ट्र हादरला; तीन ठार, वीस जखमी

महाराष्ट्रात एकाच दिवशी पाच भीषण रस्ते अपघात घडले. अकोला, बुलढाणा, रायगड, जालना आणि सोलापूर जिल्ह्यातील या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर वीस जण जखमी झाले. राज्यातील वाढते रस्ते अपघात नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

सायली मेमाणे

पुणे २४ ऑक्टोबर २०२५ :महाराष्ट्रात एकाच दिवशी पाच ठिकाणी झालेल्या भीषण रस्ते अपघातांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून तब्बल वीस जण जखमी झाले आहेत. अकोला, बुलढाणा, रायगड, जालना आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये घडलेल्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेची स्थिती आणि वाढत्या अपघातांचे प्रमाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अकोल्यात मध्यरात्रीच्या सुमारास मूर्तिजापूर तालुक्यात पायटांगी फाट्याजवळ तीन वाहनांचा अपघात झाला. कार, ट्रॅक्टर आणि ऑटोमध्ये झालेल्या या तिहेरी धडकेत ऑटोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दहा प्रवासी गंभीर जखमी झाले. भरधाव कारने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली आणि पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

बुलढाण्यात मोताळा आयटी कॉलेजजवळ कारचे ब्रेक फेल झाल्याने ती थेट वीस फूट खोल नाल्यात कोसळली. गुजरातमधील एक कुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी नातेवाईकांकडे जात असताना हा अपघात झाला. कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यात सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात भरधाव ट्रॅव्हल्स बसने कारला मागून धडक दिली. या धडकेनंतर स्विफ्ट कारने दुभाजकावर आदळून चार ते पाच पलट्या घेतल्या. कारमधील तीन प्रवासी थोडक्यात बचावले, तर ट्रॅव्हल्स चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर टोल नाक्यावरही एक अपघात घडला. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कार चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. या घटनेत कारमधील आजी-आजोबा गंभीर जखमी झाले असून, इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने एमजीएम हॉस्पिटल, पनवेल येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग पोलीस आणि स्थानिक यंत्रणांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतले.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दोन जिवलग मित्रांवर काळाने घाला घातला. दोघेही भोलाई देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या कंटेनरने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने कुर्डू गावात शोककळा पसरली आहे.

या पाचही अपघातांमधून एकच प्रश्न निर्माण होतो — राज्यातील वाढते अपघात आणि रस्ते सुरक्षेतील ढिसाळपणा कधी थांबणार? चालकांची बेपर्वाई, वाहनांचे तांत्रिक बिघाड, आणि झोपेच्या अवस्थेत वाहन चालवणे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून, वाहनचालकांनी वेग नियंत्रणात ठेवून प्रवास करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed