केडीएमसी सफाई कर्मचाऱ्यांचा उत्तम आदर्श; कचऱ्यात सापडलेले सोन्याचे दागिने महिलेला परत, वाढदिवशीच आनंदाश्रू
केडीएमसी सफाई कर्मचाऱ्यांचा उत्तम आदर्श; कचऱ्यात सापडलेले सोन्याचे दागिने महिलेला परत, वाढदिवशीच आनंदाश्रू
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची प्रामाणिक कृती; कचऱ्यात सापडलेले सोन्याचे कानातले अंकिता मोरे यांना परत, वाढदिवशीच खास भेट.
पुणे २७ नोव्हेंबर २०२५ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवत मानवतेची खरी ओळख उजळून टाकली आहे. कचरा संकलनाच्या घंटागाडीत एका महिलांचे सोन्याचे दागिने सापडल्यानंतर ते दागिने तिला परत करून कर्मचाऱ्यांनी मोठे कौतुक मिळवले आहे. केडीएमसी क्षेत्रातील हा प्रकार सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे दागिने परत मिळालेल्या महिलेसाठी हा दिवस अधिक खास होता, कारण त्याच दिवशी तिचा वाढदिवस होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेच्या पूना लिंक रोडवरील जय शिव सह्याद्री सोसायटीत राहणाऱ्या अंकिता अनिल मोरे यांचे सोन्याचे ईअर रिंग्ज चुकून सकाळी कचऱ्यात पडले. नेहमीप्रमाणे सुमित कंपनीच्या घंटागाडीने चाळीतून कचरा उचलला, पण दागिने गाडीत पडल्याचे त्या क्षणी कोणाच्याही लक्षात आले नाही. नंतर अचानक कानातले गायब झाल्याचे लक्षात येताच अंकिता मोरे यांनी तत्काळ सुमित कंपनीचे सुपरवायझर भूषण सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण घटना सांगितली.
घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच सूर्यवंशी यांनी वेळ न दवडता संबंधित कचरा गाडीचे लोकेशन शोधून काढले. ती गाडी त्याच परिसरातील नूतन ज्ञानमंदिर शाळेजवळ कचरा संकलन करत होती. त्यांनी लगेचच अंकिता मोरे यांना त्या ठिकाणी नेले. तेथे घंटागाडीवरील सफाई कर्मचारी—विनोद बेलीलकर, चैतन्य वाजे आणि सुनील तेलम—यांनी कोणताही विलंब न करता पूर्ण गाडीचा कचरा बाहेर काढून बारकाईने शोध सुरू केला.
सुमारे पाऊण तासाच्या शोधमोहिमेनंतर अखेर कचऱ्यातील पिशवीत आणि कागदी पुडीत ते सोन्याचे कानातले सापडले. दागिने आपल्या डोळ्यांसमोर परत मिळताच अंकिता मोरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे फक्त दागिने नव्हते, तर त्यांच्या आई-वडिलांनी सातवीत असताना खास दिलेली भावनिक आठवण होती. जवळपास २७ वर्षे जपलेली ही अमूल्य आठवण परत मिळाल्याने त्या अत्यानंदित झाल्या.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव आणि सुमित एल्कोप्लास्ट कंपनीचे युनिट ऑफिसर समीर खाडेही उपस्थित होते. सर्वांनी मिळून दाखवलेला प्रामाणिकपणा आणि तत्परता अनुकरणीय असल्याचे स्थानिक नागरिकांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, हा प्रसंग नव्याने घडलेला नाही. गेल्या महिन्यातही कल्याण पूर्वेतील एका महिलांचा सोन्याचा हार कचऱ्यात गेल्याची घटना घडली होती. त्या वेळीही सुमित कंपनीच्या आणि केडीएमसीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी तो हार शोधून संबंधित महिलेला परत दिला होता. आज पुन्हा एकदा त्याच प्रामाणिक सेवाभावाचे दर्शन घडत असल्याने नागरिकांनी सफाई कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
कचरा संकलनाचे काम करताना प्रचंड मेहनत, अस्वच्छता आणि नागरिकांचा ताण यांचा सामना करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही प्रामाणिकता समाजासाठी आदर्श ठरत आहे. केडीएमसीच्या या कर्मचार्यांचे काम केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित नसून, त्यांनी दाखवलेली मानवी मूल्ये आणि जबाबदारीची भावना प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information