कोंढवा, पुणे : 10 वर्षाच्या विद्यार्थ्याला बेल्टने मारहाण; ट्युशन शिक्षिका अटकेत

10 वर्षाच्या विद्यार्थ्याला बेल्टने मारहाण; ट्युशन शिक्षिका अटकेत
कोंढवा, पुणे येथील एका खासगी ट्युशनमध्ये ३५ वर्षीय शिक्षिकेने 10 वर्षाच्या मुलाला बेल्ट आणि वह्यांनी मारहाण केल्याचा प्रकार उघड.. घटनेमुळे पालकांमध्ये संताप.
सायली मेमाणे
कोंढवा पुणे २९ जुलै २०२५ : शहरातील शिक्षणसंस्थांवर आणि खासगी ट्युशन वर्गांवर विश्वास ठेवणाऱ्या पालकांसाठी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरातील एका खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या १० वर्षीय चिमुकल्याला फक्त गृहपाठ न केल्याच्या कारणावरून एका ३५ वर्षीय शिक्षिकेने बेल्ट आणि वह्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मुलगा आणि संबंधित शिक्षिका दोघंही एकाच परिसरात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने गृहपाठ न केल्यामुळे शिक्षिकेला राग आला आणि तिने आपली मर्यादा ओलांडत चक्क बेल्ट व वह्यांचा वापर करून मुलावर शारीरिक शिक्षेचा मारा केला. या मारहाणीमुळे मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या पालकांनी तातडीने कोंढवा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
कोंढवा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिक्षिकेला ताब्यात घेतलं असून तिच्यावर बालकांचे हक्क संरक्षण कायद्यानुसार (POCSO Act) तसेच भारतीय दंडविधानातील संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी ट्युशन वर्गांमध्ये योग्य देखरेख नसल्याची तक्रार नोंदवली असून अशा प्रकारच्या हिंसक शिक्षण पद्धतीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर नियमावली लागू करण्याची मागणी केली आहे.
ट्युशन क्लासेसमध्ये योग्य प्रमाणपत्रे, मुलांची सुरक्षितता, सीसीटीव्ही प्रणाली, प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक आणि पालकांच्या तक्रारींचं वेळेवर निराकरण होणं अत्यंत गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक पालकांनी अशा घटनांनी आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईल, अशी शक्यता असून पीडित मुलाला सायकोलॉजिकल काउन्सिलिंगही देण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा खासगी ट्युशन क्लासेस आणि शिक्षण क्षेत्रात गैरप्रकारावर चर्चा सुरु झाली आहे. अशा घटना टाळण्यासाठी आणि मुलांना सुरक्षित शिक्षणाचा पर्याय देण्यासाठी सरकारने तसेच शिक्षण विभागाने अधिक कठोर धोरणं आणि नियम लागू करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter