गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठी चकमक; C-60 पथकाची कारवाई सुरू
गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठी चकमक; C-60 पथकाची कारवाई सुरू
गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात C-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये दीड तासांपासून मोठी चकमक सुरू आहे. परलाकोटा आणि इंद्रावती नदी परिसरात तीव्र लढाई सुरू असून सुरक्षादलांनी नाकेबंदी केली आहे.
सायली मेमाणे
पुणे २७ ऑगस्ट २०२५ : गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांविरोधात मोठी लढाई सुरू झाली आहे. भामरागड तालुक्यातील परलाकोटा व इंद्रावती नदी परिसरात नक्षलविरोधी C-60 पथक आणि माओवादी यांच्यात गेल्या दीड तासांपासून जोरदार चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जंगलपट्टीतील या भागात सुरक्षादलांनी मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी केली असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या हालचालींविषयी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर C-60 जवानांनी आज सकाळी सर्च ऑपरेशन हाती घेतले. दरम्यान, परलाकोटा जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षादलांवर अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनीही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिल्यामुळे चकमकीला उग्र वळण लागले.
गडचिरोली जिल्हा नक्षलवादासाठी ओळखला जातो आणि दरवर्षी सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकी घडत असतात. यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घराबाहेर जाणे टाळले असून गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
C-60 पथक हे महाराष्ट्रातील विशेष प्रशिक्षित कमांडो फोर्स असून नक्षलविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी आतापर्यंत अनेक यश मिळवले आहे. यावेळीही त्यांनी नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी मोर्चा उघडला असून परिसरात संपूर्ण नाकेबंदी करण्यात आली आहे.
दरम्यान, या चकमकीबाबत अधिकृत माहिती अद्याप पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. मात्र स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही नक्षलवाद्यांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे. जवानांनी जंगलाचा घेराव वाढवला असून नक्षलवाद्यांच्या हालचाली रोखण्यासाठी हवाई गस्त आणि अतिरिक्त पथके तैनात करण्यात येण्याची शक्यता आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांविरोधातील ही चकमक आगामी काळातील परिस्थितीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून नक्षल चळवळ पुन्हा सक्रिय झाल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य पोलीस यंत्रणा आणि केंद्र सरकारचे सुरक्षा दल या भागात सतत मोहिमा राबवत असून यामध्ये स्थानिक पोलिसांचाही सक्रिय सहभाग आहे.
नक्षलवादाचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रशासन विविध विकासकामांवर भर देत आहे. मात्र, अजूनही जंगल पट्ट्यातील काही भाग नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली आहेत. यामुळे सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये अशा चकमकी घडणे अपरिहार्य बनते.
सध्या सुरु असलेल्या या लढाईचा शेवट काय होणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा सतत संपर्क सुरु असून गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.