घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप डोक्यावर हंडे घेऊन पालिका कार्यालयावर मोर्चा

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप; डोक्यावर हंडे घेऊन पालिका कार्यालयावर मोर्चा
घणसोलीत आठ दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त. महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन मोर्चा काढत रस्त्यावर आंघोळ व दात घासत अनोखा निषेध केला.
पुणे, ४ सप्टेंबर २०२६ : नवी मुंबईतील घणसोली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. पाण्यासाठी वारंवार करावी लागणारी पायपीट आणि दैनंदिन कामांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. डोक्यावर हंडे घेऊन नागरिकांनी महापालिका कार्यालयावर धडक देत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पाणीटंचाईची तीव्रता प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलकांनी अनोख्या पद्धतीने निषेध केला. नागरिकांनी रस्त्यावर बसून आंघोळ केली तसेच दात घासत महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा निषेध नोंदवला. नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. गेल्या आठवडाभरापासून घणसोलीतील विविध भागांमध्ये पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात आणि अनियमित होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक सौरभ शिंदे आणि समाजसेवक सुनील मस्कर यांच्या नेतृत्वाखाली हा ‘हंडा मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने घरगुती कामांवरही परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. काही ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी टँकर हा कायमस्वरूपी पर्याय नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी कायम आहे.
पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार पायपीट करावी लागत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली. शेकडो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी पालिका कार्यालय परिसरात एकत्र येत आपला रोष व्यक्त केला. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिला.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालिका कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दरम्यान, नगरसेवक सौरभ शिंदे यांनी पाणीप्रश्नावरून राजकारण होत असल्याचा आरोप केला. “पाणीप्रश्नावरून घाणेरडे राजकारण सुरू आहे. जे काही राजकारण करायचे असेल ते माझ्यासोबत करा, पण निष्पाप व गरीब जनतेला पाण्यासाठी वेठीस धरू नका,” असे त्यांनी म्हटले. नागरिकांचा पाणीप्रश्न सुटणार असेल तर नगरसेवकपदाचा राजीनामा देण्यासही तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे घणसोलीतील पाणीप्रश्नावरून स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare