छत्तीसगड : ‘राधे-राधे’ म्हटल्याने मुलीला मारहाण, मुख्याध्यापिका ईला कोल्विन अटकेत
‘राधे-राधे’ म्हटल्याने मुलीला मारहाण, मुख्याध्यापिका ईला कोल्विन अटकेत
छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात एका शाळेत ‘राधे-राधे’ म्हटल्याच्या कारणावरून साडेतीन वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण. मुख्याध्यापिका ईला कोल्विनला अटक; बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल.
सायली मेमाणे
पुणे १ ऑगस्ट २०२५ : छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील बागडुमर परिसरात मदर टेरेसा इंग्रजी शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला केवळ “राधे-राधे” असे म्हणून शिक्षकांना अभिवादन केल्यामुळे मारहाण केल्याचा गंभीर आरोप शाळेच्या मुख्याध्यापिका ईला कोल्विन यांच्यावर करण्यात आला आहे. यासंदर्भात पीडित मुलीचे वडील प्रवीण यादव यांनी नंदिनी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित घटनेत मुख्याध्यापिका कोल्विन यांनी मुलीचे तोंड जबरदस्तीने चिकटपट्टीने बंद केले आणि त्यानंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या घटनेनंतर जेव्हा मुलगी घरी परतली तेव्हा तिने पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला. पालकांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली आणि घटनेची तक्रार दाखल केली.
या गंभीर तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (IPC) आणि बाल संरक्षण कायदा 2015 अंतर्गत संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून ईला कोल्विन यांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली असून शाळेतील अन्य शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.
हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. एका सडेतोड गोष्टीवरून इतका अमानवी वागणूक देणे हे अत्यंत निंदनीय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शाळा प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
या घटनेमुळे शिक्षक आणि शाळा प्रशासनाच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्कता आणि जबाबदारीची गरज अधोरेखित झाली आहे.