ठाकरे बंधु युतीची चर्चा अडचणीत? संदीप देशपांडेंच्या टीकेमुळे तणाव वाढण्याची शक्यता

1
ठाकरे बंधु युतीची चर्चा अडचणीत?

ठाकरे बंधु युतीची चर्चा अडचणीत?

ठाकरे बंधुंच्या युतीच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंच्या आक्रमक पोस्टने मनसे-ठाकरे गटात तणाव वाढला; संजय राऊतांचं प्रत्युत्तर चर्चेत.

सायली मेमाणे

२३ जून २०२५ : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील संभाव्य युतीची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा भावांमधील संवाद आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमधील मनोमीलन पाहता युतीसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे चित्र होते. मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे या युतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ‘चमचा’ असा टीका करत निशाणा साधला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा ट्विटर (एक्स)वर एक तीव्र पोस्ट करून ठाकरे गटावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटले, “होय, आम्ही नवीन आहोत, पण कधी ‘केम छो वरळी’ म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत. जिलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं कधी म्हटलं नाही.” त्यांनी शिवसेना (ठाकरे गट)वर मुस्लिम मतांसाठी आपल्याच कार्यकर्त्यांवर खोट्या गुन्ह्यांची केसेस टाकल्याचा आरोप करत म्हटले, “आम्हाला अभिमान आहे की आम्ही नवीन आहोत. तुम्ही जुने असून काय उपटली?”

देशपांडेंच्या या आक्रमक शैलीमुळे ठाकरे गटातूनही प्रतिक्रिया उमटल्या. खासदार संजय राऊत यांनी संयम राखून प्रत्युत्तर दिलं. “राजकारणात माणसाने संयमी आणि आशावादी असावं लागतं. काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. नुसता उथळपणा करून राजकारण चालत नाही,” असं सूचक विधान करत राऊतांनी संदीप देशपांडेंना सुनावलं. त्यांनी यावर अधिक स्पष्ट भूमिका घेत पुढे म्हटले, “जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा किंवा मराठी माणसाच्या हक्कांचा प्रश्न येतो, तेव्हा संयम आवश्यक असतो. कोणी काहीही बडबड करेल, त्याला फारसा अर्थ नसतो.”

राजकीय विश्लेषकांच्या मते, संदीप देशपांडे यांच्या या भूमिकेवरून हे फक्त व्यक्तिगत मत नसून मनसेची अधिकृत भूमिका असेल, तर ही युती जवळपास अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक भावनाही आहेत. पण संदीप देशपांडे यांनी युतीसंदर्भात स्पष्टपणे म्हटलं होतं, “युतीबाबत दोन्ही पक्षप्रमुख निर्णय घेतील. ताटातल्या चमच्याने ताटात राहावं.”

राजकीयदृष्ट्या ही युती किती शक्य आहे हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र अशा पोस्ट आणि प्रतिउत्तरेमुळे निर्माण होणारा तणाव दोन्ही पक्षांच्या चर्चांना फटका देऊ शकतो. यामुळे पुढील काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून यावर स्पष्ट भूमिका घेण्याची अपेक्षा राजकीय वर्तुळ व्यक्त करत आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

1 thought on “ठाकरे बंधु युतीची चर्चा अडचणीत? संदीप देशपांडेंच्या टीकेमुळे तणाव वाढण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed