नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यांचा होणार मोठा विकास; कुंभमेळा 2027 पूर्वी पायाभूत सुविधा मजबूत होणार

1
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमुख महामार्गांच्या विकासास तत्त्वतः मंजुरी दिली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमुख महामार्गांच्या विकासास तत्त्वतः मंजुरी दिली

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमुख महामार्गांच्या विकासास तत्त्वतः मंजुरी दिली; डीपीआर तयार होणार.

सायली मेमाणे

नाशिक २३ जून २०२५ : नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही मान्यता दिली. लवकरच या रस्त्यांसाठी डीपीआर (Detailed Project Report) तयार केला जाणार असून त्याला निधी मंजूर केला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी केंद्र सरकारच्या मदतीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे, खासदार स्मिता वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार मंगेश चव्हाण आणि केंद्र तसेच राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नाशिककडे येणाऱ्या प्रमुख मार्गांमध्ये मुंबई, पुणे, गुजरात, पालघर, छत्रपती संभाजीनगर, धुळे व अहिल्यानगरकडून येणाऱ्या मार्गांचा समावेश आहे. हे सर्व मार्ग कुंभमेळ्याच्या काळात महत्त्वपूर्ण असतील. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गांशी जोडण्याचे नियोजन केले आहे.

गडकरी यांनी मंजुरी दिलेले मुख्य रस्ते प्रकल्प पुढीलप्रमाणे:

  • घोटी–पाहिने–त्र्यंबकेश्वर–जव्हार फाटा
  • द्वारका सर्कल ते सिन्नर आयसी-२१ (समृद्धी महामार्ग) ते नांदूर शिंगोटे–कोल्हार
  • नाशिक ते कसारा
  • सावली विहीर (IC-20 समृद्धी महामार्ग) ते शिर्डी–शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द)
  • नाशिक–धुळे
  • त्र्यंबकेश्वर–जव्हार–मनोर
  • सावली विहीर–मनमाड–मालेगाव
  • घोटी–सिन्नर–वावी–शिर्डी
  • शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द)–अहिल्यानगर (खरवंडी फाटा)

या प्रकल्पांच्या मंजुरीनंतर भाविकांना सुटसुटीत, जलद आणि सुरक्षित वाहतूक अनुभवता येईल. कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याने ही रस्त्यांची संरचना महत्वाची ठरणार आहे.

याशिवाय, नाशिक रिंगरोड प्रकल्पालाही मंजुरी मिळाली आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा मार्ग सहापदरी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यासोबतच द्वारका सर्कलच्या विकासाची योजना कळंबोली जंक्शनच्या धर्तीवर दोन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे.

हा निर्णय नाशिकच्या दीर्घकालीन वाहतूक नियोजनासाठी क्रांतिकारी ठरेल. केवळ कुंभमेळा नव्हे, तर सर्वसामान्य प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासासाठी हे रस्ते भविष्यातील आर्थिक आणि सामाजिक विकासाचे केंद्र ठरू शकतात.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

1 thought on “नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यांचा होणार मोठा विकास; कुंभमेळा 2027 पूर्वी पायाभूत सुविधा मजबूत होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed